98451
सासोलीत बेकायदा वृक्षतोड
सुरूच ः डॉ. परुळेकर
कृती समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यांतील ‘इको सेन्सिटिव्ह’ आणि ‘व्याघ्र कॉरिडॉर झोन’मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतरही बेकायदा वृक्षतोड सुरू असल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी चिंता व्यक्त केली असून, शासनाने नेमलेल्या कृती समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सासोली येथील एका कंपनीने केलेल्या मोठ्या वृक्षतोडीकडे लक्ष वेधल्यानंतर समितीने कारवाई केल्याचा दावा डॉ. परुळेकर यांनी केला आहे. त्यामुळे या कृती समितीमध्ये पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्री. परुळेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यांतील २५ गावांमध्ये वृक्षतोड बंदी असतानाही सासोली येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. चार दिवसांपूर्वी एका कंपनीने जेसीबी आणि बुलडोझरच्या मदतीने अवैधरित्या घुसखोरी करून ही तोड केली. याबाबत उपवनसंरक्षकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्वरित कारवाई करून जेसीबी मशिनसारखी यंत्रणा जप्त केली; मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यांत व्याघ्र कॉरिडॉर आणि इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये वृक्षतोडीस बंदी घातली आहे. यासाठी महसूल, वन आणि पोलिस यंत्रणेतील सदस्यांचा समावेश असलेली कृती समिती नेमली आहे. ही कृती समिती केवळ कागदावरच राहिली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कृती समितीचे प्रवक्ते वैभव बोराटे यांनी प्रसिद्धपत्रक जारी करून समिती कार्यरत असल्याचे स्पष्ट केले.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘कृती समिती कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी, इको-सेन्सिटिव्ह झोनमधील सरमळे गावात १०० एकर जमिनीत वृक्षतोड सुरू आहे. तसेच कोलझर, घारपी, फुकेरी अशा अनेक ठिकाणी जमिनीचे मोठे व्यवहार होत असून वृक्षतोडीची भीती व्यक्त होत आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत परप्रांतीय जमीन खरेदीसाठी मोठी घाई करत आहेत. मायनिंगचा धोका संपलेला नसतानाही हे व्यवहार होत असल्याने भविष्यात मोठा धोका आहे. ‘वनशक्ती’ संस्थेने १५ ते १६ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘सावंतवाडी वाईल्ड लाईफ कॉरिडॉर’ आणि ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’साठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मिळवले आहेत. मात्र, सातत्याने होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पट्टेरी वाघ, माकड, वानर, गवे, सांबर, बिबट्या असे विविध वन्य प्राणी लोकवस्तीत घुसत आहेत आणि लोकांवर हल्ले करत आहेत. सावंतवाडी शहरात गुराढोरांप्रमाणे गवे फिरत आहेत.’’
--------------
पर्यावरणवादींना प्राधान्य द्या
डॉ. परुळेकर म्हणाले, ‘‘कृती समितीमध्ये पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींना प्राधान्य द्यावे, जेणेकरून वृक्षतोडीसारख्या गोष्टींना आळा बसू शकेल किंवा त्याबाबतची माहिती तातडीने समोर येईल. आज सासोली येथील जमीन सामायिक असून, काही अधिकारी तेथील नागरिकांना धमकावत आहेत, गुन्हे दाखल करण्याची भीती घालत आहेत. अशा अधिकाऱ्यांनी हे सुरू ठेवल्यास जनआंदोलन उभारले जाईल.’’