98447
सोनवडेवासीय गावहितासाठी एकवटले
संरक्षक भिंतीची दुरुस्ती; बांधकाम कामगारांचेही श्रमदानात योगदान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः ‘गाव करी ते राव काय करी’ या प्रसिद्ध म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता. १२) सोनवडे तर्फ हवेली या गावात आला. एका अभिनव उपक्रमांतर्गत ग्रामस्थ आणि गावातील गवंडीकाम करणाऱ्या कारागिरांनी एकत्र येत श्रमदानातून ग्रामपंचायत कार्यालयाची जीर्ण झालेली संरक्षण भिंत तसेच पावसाळ्यात कोसळलेल्या भिंतीची डागडुजी केली. कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी या उपक्रमाचे प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले. ग्रामपंचायत अधिकारी सविता आडेलकर यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तालुक्यातील कर्ली नदीच्या किनारी वसलेले सोनवडे तर्फ हवेली हे गाव निसर्ग सौंदर्याने समृद्ध आहे. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अभिनव उपक्रम राबवण्याचा असा संकल्प ग्रामपंचायतीच्या मासिक व ग्रामसभेत करण्यात आला होता. सोनवडेतील बांधकाम कामगारांना ग्रामपंचायतीने कामगार नोंदणीसाठी सहकार्य केले होते. त्यामुळे या कामगारांना शासकीय योजनांचा लाभ झाला होता. याबद्दल ग्रामपंचायतीसाठी काहीतरी करण्याची इच्छा या कामगारांनी व्यक्त केली होती. त्यामुळे लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून विविध कामे पूर्णत्वास नेण्याच्या ग्रामपंचायतीच्या संकल्पाला बळ देण्याचा निर्धार या ग्रामस्थ आणि बांधकाम कामगारांनी केला. याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. १२) सकाळपासून श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत इमारत सभोवताली असणारी संरक्षक भिंत मोडकळीस आली होती. त्याची डागडुजी करून देण्याचे ग्रामस्थांनी ठरवून सकाळी ८.३० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत अविरत काम सुरू केले. यात सुमारे ३० ग्रामस्थांनी पावसाळ्यात कोसळलेली भिंत सुद्धा बांधून दिली. या अभिनव उपक्रमाची माहिती गटविकास अधिकारी वालावलकर यांना देण्यात आली होती. वालावलकर यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन या कामाची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सरपंच नाजुका सावंत, उपसरपंच सविता धुरी, ग्रामपंचायत अधिकारी सविता आडेलकर यांनी उपक्रमासाठी प्रयत्न केले. ग्रामपंचायत सदस्य संदेश बळी, हेमंत सोनवडेकर, अरविंद शिरोडकर, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष समीर धुरी यांनीही श्रमदानात सहभाग घेतला. जितेंद्र टिळवे, सचिन सोनवडेकर, समीर सारंग, गितू धुरी, अमित सोनवडेकर, रवींद्र धुरी, वासुदेव धुरी, संतोष देवळी, धोंडी धुरी, राजू गुरव, पिंट्या धुरी, अशोक धुरी, गणपत परब, सुधीर धुरी, सरस्वती धुरी, शरद धुरी, यशवंत धुरी, राजन धुरी, कृष्णा धुरी, राजन परब, ग्रामपंचायत कर्मचारी प्रथमेश वाईरकर, अक्षय धुरी व इतर ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या आदर्शवत उपक्रमाचे तालुका व जिल्ह्यातील इतर गावही अनुकरण करतील, असा विश्वास वालावलकर यांनी व्यक्त केला. गावातर्फे वालावलकर यांचा सन्मान करण्यात आला.
.................
सोनवडेवासीयांच्या योगदानाला सलाम
ग्रामपंचायत अधिकारी सविता आडेलकर म्हणाल्या, "गावाच्या विकासातील हे आश्वासक पाऊल होते. हे फक्त श्रम नव्हते तर गावापोटी असणारी आपुलकी, आस्था आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरणच म्हणावे लागेल. सकाळपासून रात्रीपर्यंत या सर्व मंडळीने काम केले. यातूनच गावाप्रती असणारे त्यांचे प्रेम दिसून आले. या सर्वांना एक मानाचा मुजरा. सोनवडेवासीयांचे कौतुक करावे तेवढे कमीच वाटते."