जिल्ह्यात १९२ वस्त्यांना मिळणार नवी ओळख
जिल्हाधिकारी धोडमिसे ः जातिवाचक नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण १९२ जातिवाचक वस्त्यांची व २५ जातिवाचक रस्त्यांची नावे बदलण्याबाबतचा शासन निर्णय ‘जातिवाचक वाडी - वस्त्यांची नावे बदलणे’ या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जातिवाचक वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.
ग्रामीण भागातील केवळ वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णयान्वय निश्चित केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण १९२ जातिवाचक वस्त्यांची व २५ जातिवाचक रस्त्यांची नावे बदलण्याकरिता ग्रामसभेचा ठराव पास करून त्याबाबतचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले होते. हा प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविले होते. शासन निर्णयान्वये जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतचे अधिकार ‘जातिवाचक वाडी - वस्त्यांची नावे बदलणे’ या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १९२ वस्त्यांची व २५ रस्त्यांची जुनी जातिवाचक नावे बदलून ग्रामसभा ठरावात प्रस्तावित केलेली नावे शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार या आदेशाद्वारे जातिवाचक नावे बदलून नवीन प्रस्तावित नावांना मान्यता देण्यात आलेली आहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री नीतेश राणे हे शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत होते. या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी धोडमिसे आणि सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोट
जातिवाचक वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढला आहे. तो गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत, बांधकाम विभाग आदी संबंधित विभागांना देण्यात आले असून त्यानुसार संबंधित विभाग जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची, लोकशाही मूल्यांशी निगडित नावे बदलण्याची कार्यवाही करणार आहेत. ही कार्यवाही पुढील काळात सुरू राहणार आहे.
- संतोष चिकने, समाजकल्याण आयुक्त, सिंधुदुर्ग