९८५५१
गोवंशसदृश ८० किलो मांस जप्त
सावंतवाडीत कारवाई ः एकाच कुटुंबातील तिघे संशयित ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः शहरातील बाहेरचावाडा परिसरात येथील पोलिसांनी एका घरातून तब्बल ८० किलो गोवंशसदृश प्राण्याचे मांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी सरफराज भाउद्दिन ख्वाजा (वय ४५), त्याची बहीण मनोहर भाउद्दिन ख्वाजा (४०) आणि आई हसीना भाउद्दिन ख्वाजा (वय ७५) या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
अधिक माहिती अशी ः येथील पोलिसांना बाहेरचावाडा येथील पालिका हद्दीतील घरात गोवंशसदृश मांस, तसेच गांजा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर येथील पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ पोलिस अंमलदारांच्या पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. पोलिस आल्याची माहिती मिळताच सरफराज ख्वाजाच्या कुटुंबाने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. पोलिसांनी घराभोवती बंदोबस्त लावला आणि परिसराची नाकाबंदी केली. पोलिसांनी कुटुंबाला दरवाजा उघडण्याची विनंती केली. दरवाजा न उघडल्यास दरवाजे-खिडक्या तोडून घरात प्रवेश करावा लागेल, असा इशारा दिल्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा उघडला.
दरवाजा उघडताच पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या पथकाने घराची झाडाझडती घेतली. यावेळी घरात ८० किलो गोवंशसदृश प्राण्याचे मांस आढळले. हे मांस विक्रीसाठी ठेवल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. घरात सापडलेला वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, मांस कापण्याचा चाकू आणि मोठा फ्रीजर यावरून याची पुष्टी झाली. पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करत ८० किलो मांस आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले. पोलिसांकडून तब्बल दोन तास ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी सरफराज ख्वाजा याच्यासह बहीण मनोहर ख्वाजा आणि आई हसीना ख्वाजा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरफराजला अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हे मांस त्याने नेमके कुठून आणि कोणाकडून आणले, याबाबतची पुढील माहिती चौकशीत घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी सांगितले.
‘मांस’प्रकरणात
याआधीही गुन्हा
संशयित सरफराज ख्वाजा याच्यावर गोवंशसदृश मांस बाळगल्याप्रकरणी दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. यापूर्वी, मार्चमध्ये येथील पोलिसांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या मदतीने थरारक पाठलाग करत त्याला माडखोल येथे ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याच्या मोटारीतून १३० किलो मांस जप्त केले होते. तेव्हाही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
छापा पडताच
घर केले आतून बंद
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस बाहेरचावाडा परिसरातील सरफराज ख्वाजा याच्या घराची झडती घेण्यासाठी गेले असता कुटुंबाने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराभोवती बंदोबस्त लावून परिसराची नाकाबंदी केली. व्हॅनवरील अनाउन्समेंट सिस्टीमद्वारे कुटुंबाला दरवाजा उघडण्याची विनंती करत दरवाजा न उघडल्यास दरवाजे-खिडक्या तोडून घरात प्रवेश करावा लागेल, असा इशारा दिला होता, त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा उघडला.