कुत्र्यांच्या पाठलागामुळे
दुचाकीस्वार ठार
रत्नागिरीः शहरातील आरोग्यमंदिर येथील रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सिद्धांत हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान स्वाराचा मृत्यू झाला. निखिल सदाशिव लोध (वय ४३, रा. आरोग्यमंदिर, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल हे आरोग्यमंदिर येथून दुचाकीने पांडवनगरमार्गे जात असताना त्यांच्या गाडीच्या पाठीमागे कुत्रे लागले. त्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा सात ऑगस्टला दुपारी मृत्यू झाला.
.........
सरंद गुरववाडीमध्ये
तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी ः सरंद-गुरववाडी (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमेश्वर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. राज रवींद्र गुरव (वय २२, रा. सरंद-गुरववाडी-संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास निदर्शनास आली.
------------
जंगलवाडीत दारूविक्रीवर
पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ झाडीझुडपाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५५० रुपयांची पाच लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. देवरूख पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन महादेव कांबळे (वय ४३, रा. दाभोळे कोंडवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास जंगलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या टाकीजवळ झाडीझुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सचिन कांबळे हे विनापरवाना हातभट्टीची दारूविक्री करत असताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५५० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे यांनी देवरूख पोलिसात तक्रार दिली.