संगणक परिचालकांची
दिवाळीही होणार कडू
तरतूद न केल्याने चार महिन्यांचे मानधन थकीत
साखरपा, ता. १४ : जिल्ह्यातील सुमारे ६६६ संगणक परिचालक गेले चार महिने मानधनापासून वंचित आहेत. गणपती सणानंतर दिवाळीही कडूच होणार, हे निश्चित आहे. जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे मागील जून महिन्यापासून म्हणजेच चार महिने मानधन थकीत आहे.
गेली सुमारे पंधरा वर्षे संगणक परिचलक महिना दहा हजारएवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. मानधनवाढ व्हावी, यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. एप्रिल महिन्याचे मानधन अदा केल्यापासून संगणक परिचालकांना मानधन देण्यात आलेले नाही. ऑगस्ट महिन्यात गणपती उत्सवात केवळ मे महिन्याचे मानधन खात्यावर जमा करून परिचालकांची बोळवण करण्यात आली होती. त्यानंतर एकाही महिन्याचे मानधन परिचालकांना देण्यात आलेले नाही. गेले चार महिने परिचालक मानधन होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीला तरी थकीत सर्व महिन्यांचे मानधन मिळेल का, असा प्रश्न परिचालक विचारात आहेत.