कोकण

बिग स्टोरी ः वेळास, आंजर्लेत सागरी संवर्धनाचा नवा अध्याय

CD

बिग स्टोरी
99555
99554
rat19p17.jpg, rat19p18.jpg- वेळास किनारे
rat19p20.jpg
99557
वेळास परिसरात आढळणारे हॉर्नबिल
rat19p21.jpg, - rat19p22.jpg-
99558, 99559
वेळास किनारे आढळणारे पक्षी
(छाया ः मोहन उपाध्ये, मंडणगड)
--------
99556
rat19p19.jpg- आंजर्ले किनारा


इंट्रो

रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास (ता. मंडणगड) आणि आंजर्ले (ता. दापोली) हे दोन किनारे ‘जैवविविधता वारसास्थळ’ म्हणून घोषित केले आहेत. या निर्णयामुळे कोकणातील सागरी संवर्धनाचा नवा अध्याय सुरू झाला असला तरी, या वारशाची जपणूक करताना विकासाचे संतुलन कसे राखावे, हा मोठा प्रश्न आता प्रशासन आणि स्थानिक समाजासमोर उभा आहे. वेळास आणि आंजर्लेचा वारसा केवळ किनाऱ्यांच्या सौंदर्यापुरता मर्यादित नसून, तो माणूस, समुद्र आणि निसर्ग यांच्या सहजीवनाचा सजीव दस्तावेज आहे. या वारशाचे संरक्षण केल्याशिवाय कोकणचा निसर्ग आणि त्याची ओळख टिकणार नाही. ‘जैवविविधता वारसा स्थळ’ म्हणून घोषित केलेले हे राज्यातील पहिले दोन किनारे आहेत. या घोषणेमुळे केवळ या गावांचा गौरव वाढलेला नाही, तर स्थानिकांनी गेल्या दोन दशकांपासून केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीचे फलितही अधोरेखित झाले आहे.

- सचिन माळी, मंडणगड

---------

वेळास, आंजर्लेत सागरी संवर्धनाचा नवा अध्याय
जैवविविधता वारसास्थळ; माणूस, समुद्र आणि निसर्गाच्या सहजीवनाचे मॉडेल
-----

ऑलिव्ह रिडले कासव - किनाऱ्यांचे अद्वितीय वैशिष्ट्य

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (MSBB) आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. वेळास आणि आंजर्ले हे दोन्ही किनारे ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या आणि पिल्ले बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जातात. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळात या दुर्मिळ आणि संकटग्रस्त कासवांच्या माद्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवक यांच्या देखरेखीखाली या अंड्यांचे संरक्षण व संवर्धन केले जाते. याच पार्श्वभूमीवर सुरू झालेला वेळास कासव महोत्सव आज जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
हजारो पर्यटक या उत्सवाला भेट देऊन छोट्या कासवपिल्लांना समुद्राकडे धावतानाचा अविस्मरणीय अनुभव घेतात. आंजर्ले किनाऱ्यावरील प्रवाळशेते, मॅंग्रोव्ह्स, शिंपल्यांचे अधिवास आणि सागरी पक्ष्यांचे वास्तव्य यामुळे त्याची जैवविविधता सागरी परिसंस्थेचे संतुलन राखण्यास अत्यंत महत्त्वाची ठरते.

----

समुद्री जैवविविधतेचे जिवंत प्रयोगशाळा

वेळास आणि आंजर्ले हे किनारे केवळ कासवांसाठीच नव्हे, तर समुद्री सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय जीवसृष्टी आणि खारफुटीच्या वनस्पतींसाठीही महत्त्वाचे आश्रयस्थान आहेत. अधूनमधून दिसणारे डॉल्फिनचे थवे ही या भागातील सागरी संपन्नतेची साक्ष देतात. खडकांवर आणि वाळूत खेकडे, लॉबस्टर, स्टारफिश, जेलीफिश, सी अॅनेमोनी, सागरी शिंपले आढळतात. किनाऱ्यालगतच्या मॅंग्रोव्ह प्रजातींनी (Mangroves) क्षारयुक्त पाण्याच्या प्रभावातही परिसंस्थेचे संतुलन राखले आहे. किंगफिशर, करंज आणि इतर जलवनस्पती केवळ सागरी जीवांना आश्रय देत नाहीत, तर मातीच्या अपक्षयावरही नियंत्रण ठेवतात.

-----

पक्ष्यांचे निवासस्थान - जिवंत आकाश

या किनाऱ्यांवर पक्ष्यांचे जैववैविध्यही अतिशय समृद्ध आहे. आंजर्ले येथे ४१ प्रजाती तर वेळास येथे १६ प्रजातींची अधिकृत नोंद झाली आहे. यात सँडपायपर, इग्रेट, ब्राह्मणी पतंग, किंगफिशर, सीगल्स यांचा समावेश आहे. हिवाळ्यात परदेशातून स्थलांतरित होणारे पक्षीही या किनाऱ्यांवर थांबतात, जे येथील पर्यावरणाची आरोग्यदायक स्थिती दर्शवतात.

----

स्थानिक समुदायाचे अनोखे योगदान

वेळासमधील ‘सह्याद्री निसर्गमित्र’ संस्थेने २००२ पासून सुरू केलेले कासव संवर्धन कार्य हे आज राज्यभर अनुकरणीय ठरले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमातून पर्यटनाच्या संधी ओळखून त्याला स्वीकारले आहे. गावातील महिला बचतगट, युवक मंडळे आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत ‘होमस्टे’, मार्गदर्शन आणि जनजागृती कार्यक्रम सुरू केले. या चळवळीमुळे रोजगाराची संधी निर्माण झाली, तर संवर्धनाचे आर्थिक महत्त्वही पटले. कासव महोत्सवामुळे वेळास आणि आंजर्ले हे पर्यटन आणि पर्यावरण एकत्र शक्य आहे, याचे मॉडेल बनले आहे. प्लास्टिकमुक्त क्षेत्र, स्वच्छता अभियान, पर्यावरण शिक्षण, ‘फक्त पाहा, स्पर्श नको’ या तत्त्वांचा प्रसार गावकऱ्यांनी केलेला आहे, जे पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे.

-----

जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची भूमिका

या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामपंचायती आणि जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर (PBR)’ या माध्यमातून स्थानिक परिसंस्थेतील वनस्पती, प्राणी, सागरी जीवसृष्टी आणि पारंपरिक ज्ञानाचे दस्तावेजीकरण करण्यात आले. हे भविष्यातील संशोधन आणि संवर्धनासाठी अमूल्य ठरेल.

-----

विकास विरुद्ध संवर्धन - संतुलनाची गरज

वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यावरणपूरक पर्यटनाच्या संधी वाढतील, मात्र त्याचवेळी अनियंत्रित पर्यटनामुळे जैवसाखळी धोक्यात येण्याची शक्यता आहे. किनाऱ्यालगतची बांधकामे, वाहनांची वर्दळ, प्लास्टिक कचरा आणि समुद्री प्रदूषण या गोष्टींनी कासवांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणांवर प्रतिकूल परिणाम होतो. विकास म्हणजे केवळ सोयी-सुविधा नव्हे, तर निसर्गाशी सुसंवाद साधणारी प्रक्रिया असावी लागते. जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा मिळाल्याने या परिसराला प्रशासनिक संरक्षण आणि नियमनाचे अधिकार लागू होतील, जे वेळेवर अंमलात आणले, तरच हे नाजूक परिसंस्थेचे संवर्धन शक्य होईल.

----------
चौकट
शाश्वत पर्यटन विकासासाठी

* प्लास्टिकमुक्त किनारे
* इकोफ्रेंडली टुरिस्ट शेड्स
* संपूर्ण माहिती देणारी केंद्रे
* स्थानिक गाईड प्रशिक्षण
* इको होमस्टे योजना
* सागरी संवर्धन शिक्षण केंद्र
* मरीन इंटरप्रीटेशन सेंटर

---------

ग्रामसंवर्धनातून समुद्र संवर्धनापर्यंत आदर्श

वेळास गावाने गेल्या दोन दशकांत सागरी संवर्धनात जनआंदोलन निर्माण केले आहे. १९९६ पासून ग्रामस्थांनी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या मदतीने कासव संवर्धन प्रकल्प सुरू केला. गावात कासव अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी कासव पाळणाघर (Hatchery) उभारले. दरवर्षी मार्च- एप्रिलमध्ये होणाऱ्या कासव उत्सवामुळे गावाला पर्यटकांचा ओघ वाढला; पण गावाने नेहमी पर्यावरणाला प्राधान्य दिले. गावात प्लास्टिकबंदी, पर्यटक मर्यादा आणि निसर्ग शिक्षण उपक्रम राबवले जात आहेत.

----------
चौकट

आंजर्लेतील वैशिष्ट्ये

* सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा
* खारफुटी वनस्पती
* प्रवाळशेते, सागरी पक्ष्यांचे अधिवास स्थलांतरित पक्ष्यांच्या मुक्कामाचे ठिकाण
* सागरी जीवसृष्टीसाठी आवश्यक घटक
* मच्छीमारीसाठी आवश्यक जैवसाखळी

-----------
पॉइंटर १

वारसास्थळ घोषणेचे फायदे

संवर्धनाला कायदेशीर संरक्षण जैवविविधतेचा ऱ्हास रोखणार
जिल्हा पातळीवर संसाधने उपलब्ध
पर्यावरणपूरक पर्यटनाने विकास शैक्षणिक, संशोधन उपक्रमांना चालना
स्थानिकांना मिळेल स्थिर उत्पन्नाचे साधन

----------

भविष्यकालीन योजना

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने पुढील टप्प्यात संवर्धन आराखडा (Conservation Action Plan) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या आराखड्यात पुढील बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे. यामध्ये कासव आणि इतर समुद्रीजीवांचे दीर्घकालीन निरीक्षण केंद्र, खारफुटी पुनर्संचय, पर्यावरण शिक्षणकेंद्र उभारणी आणि स्थानिक युवकांना प्रशिक्षित संवर्धनदूत बनवणे तसेच, दोन्ही गावांमध्ये इकोटुरिझम मार्गदर्शक तत्त्वे, कचरा व्यवस्थापन योजना आणि प्लास्टिकविरोधी नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

---------

समुद्रकिनाऱ्यांचे जतन भविष्याच्या पिढ्यांसाठी वारसा

वेळास आणि आंजर्ले ही दोन गावे केवळ भौगोलिक स्थळे नाहीत; ती संवर्धन, लोकसहभाग आणि पर्यावरणपूरक विकासाचा जिवंत आदर्श आहेत. स्थानिकांचा अथक प्रयत्न, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शासनाचा पाठिंबा या त्रिसुत्रीमुळे या किनाऱ्यांना मिळालेला ‘वारसास्थळ’ दर्जा हा केवळ सन्मान नाही, तर जबाबदारीचा ध्वज आहे. येथील लहानसे कासव जेव्हा पहिल्यांदा समुद्राकडे धाव घेते तेव्हा ती फक्त एक निसर्गाची घटना नसते. ती आपल्या समाजाच्या पर्यावरण-जागरूकतेची पावती असते. जिथे निसर्ग, विज्ञान आणि समाज हातात हात घालून पुढे जात आहेत. हे किनारे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पर्यावरण वारसास्थळ बनण्याची क्षमता बाळगतात.

-----------
चौकट

काय आहे संवर्धन कृती आराखडा

* ग्रामजैवविविधता समित्या सक्रिय करणे
* स्थानिक गावकऱ्याना प्रशिक्षण
* विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता अभ्यास
* भ्रमंती व सागरी शिबिरे आयोजित करणे
* CSR निधीद्वारे संवर्धनासाठी आर्थिक पाठबळ
* स्थानिक उत्पादनांना ‘इको-टॅग’ चे पाठबळ
* नियमित किनारे स्वच्छ ठेवणे
* नित्यनियमाने सागरी निरीक्षण अहवाल

------------

ग्रामसभांमध्ये संवर्धनाचे निर्णय

वेळास आणि आंजर्ले या दोन्ही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी संवर्धनाचा धागा स्वतःच्या हातात घेतला आहे. स्वयंसेवी संस्थांबरोबर तरुणांनी बीच किनारे स्वच्छता मोहिम घेणे, सागरी शिक्षण शिबिरे आणि पर्यावरण जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत. शाळांमधून विद्यार्थ्यांना कासव संवर्धन आणि सागरी जैवविविधता या विषयी शिकवले जाते. ग्रामसभांमध्ये संवर्धनाचे निर्णय घेतले जातात जसे की, रात्री किनाऱ्यावर वाहनबंदी आणि पर्यटकांसाठी निश्चित क्षेत्र. या दोन्ही गावांसाठी तज्ज्ञांचे सल्ले, वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. सागरी पर्यावरण अभ्यासकांचा सल्ला आहे की, आता या किनाऱ्यांसाठी पर्यावरणीय वहनक्षमता (Carrying Capacity) निश्चित करणे अत्यावश्यक आहे. यामुळे एका दिवशी किती पर्यटक किंवा वाहने किनाऱ्यावर परवानगीने येऊ शकतात यावर नियंत्रण राहील तसेच कासवांच्या प्रजनन हंगामात रात्री प्रकाशबंदी (Light Pollution Control) लागू करणे गरजेचे आहे कारण, तीव्र प्रकाशामुळे नवजात कासवांची दिशाभूल होते.

--------------

राज्य आणि केंद्र सरकारचा सहभाग

राज्य जैवविविधता मंडळाने या ठिकाणांना राष्ट्रीय जैवविविधता वारसास्थळांच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे केंद्र सरकारकडून संशोधन, शिक्षण आणि संवर्धनासाठी अनुदान मिळण्याची शक्यता आहे याशिवाय ‘ब्लू इकॉनॉमी’च्यादृष्टीने महाराष्ट्रातील किनारपट्टीवर इको-टुरिझम पायलट प्रोजेक्ट्स सुरू करण्याचा विचारही चर्चेत आहे.

------------
महत्वाच्या नोंदी

* वेळास येथे प्रथम २००२ मध्ये समुद्री कासवाची एकूण ५० घरटी संरक्षित करण्यात आली होती. २०२४-२५ मध्ये एकूण ७० घरटी संरक्षित करण्यात आली. गेल्या पंचवीस वर्षात घरट्यांचा आकडा वाढताना दिसत आहे.
* टॅगिंग केलेली कासव आणि प्रवास -वेळास किनाऱ्यावरून प्रथमा पहिले कासव २५ जानेवारी २०२२ सोडण्यात आले. त्याने अंदाजे २ हजार ७०० किमी प्रवास केला.
* आंजर्ले किनाऱ्यावरून सावनी २५ जानेवारी २०२२ सोडण्यात आले. त्याने १,९६० किमी इतका प्रवास केला.

----------
कोट
वेळास समुद्रकिनारी कोल्हे, बिबट्या, रानडुक्कर यांचा वावर आहे. पक्षी जगतात कोकणात सगळ्यात महत्वाचा आणि मोठा असलेला पांढऱ्या पोटाचा समुद्री गरूड येथे दिसतो. तसेच मोरघार, काही वेळेस स्पून बिल, फ्लेमिंगो दिसतात. लहान पक्ष्यांमध्ये परदेशी पाहुणे सीगल, टर्न याचे पाच ते सहा प्रकार, सॅन्ड पाईपर, प्लोअरचे दोन प्रकार आहेत. हॉर्नबिल, वायरटेल स्वालो, मुनिया, मार्टिन, लार्क, घुबड, टिटवी अशा प्रकारचे सुमारे ३५ पक्षी दिसतात. थंडीत ऑलिव्ह रीडले अंडी घालण्यास किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावर असलेल्या रॉक पॅचवर तीन ते चार शेवाळ्याचे प्रकार, कालवे, सी अनिमॉन, सी अर्चिन, सी स्लग, स्पंज अशा खाऱ्या पाण्यातील जिवांचा आढळ आहे. जैवविधतेता आणि वन्यजीवांच्यादृष्टीने हा किनारा म्हणजे सुरक्षित अधिवास आहे.
- मोहन उपाध्ये, सहाय्यक संशोधक कांदळवन प्रतिष्ठान.
------------
कोट
दोन्ही किनाऱ्यावर स्थानिक ग्रामस्थांनी राबवलेली मोहीम अबाधित राहायला हवी. बाहेरून येणाऱ्या पर्यटक किंवा प्रवासी यांनी या किनाऱ्यावरील जैवविविधतेचे भान ठेवून कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी होणे अत्यावश्यक आणि काळाची गरज आहे. ऑलिव्ह रिडले कासवामुळे किनाऱ्याला ग्लोबल स्वरूप प्राप्त आहे. ही जैवविविधता वारसास्थळे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वय सहयोगातून जोपासली जाणे अपेक्षित आहे.
- गिरिजा देसाई, विभागीय वनाधिकारी रत्नागिरी.
------------
कोट
समुद्री जीव, समुद्राच्या जवळ असणाऱ्या वनस्पती यांचे संवर्धन होणे महत्वाचे आहे. वारसास्थळ आणि पर्यटनाच्यादृष्टीने काम होत असताना भविष्यात याला कोणताही धोका निर्माण होऊ नये. आंजर्ले किनारी सुरवातीस ऑलिव्ह रिडले कासवांची १० घरटी सापडली होती, किनारा संवर्धनामुळे आता त्याचे प्रमाण ४० घरट्यांवर गेले आहे. यातून किनाऱ्याची सुरक्षितता आणि जैवविविधता स्पष्ट होते.
- अभिनय केळसकर, सहाय्यक उपजीविका तज्ञ, कांदळवन प्रतिष्ठान.
-----
कोट
वेळास परिसरात २००२ पासून काम सुरू केले. लोकसहभागामुळे त्याला चांगले यश मिळाले. शासनाच्यावतीने दोन्ही स्थळांना जैवविविधता वारसास्थळ म्हणून परवानगी मिळाली आहे. याचा आनंद आहे. याठिकाणी जैवविविधता संवर्धित करण्यासोबत पर्यटन वाढेल आणि त्याचा फायदा स्थानिकांना मिळेल.
- भाऊ काटदरे, अध्यक्ष, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था.
-----
कोट
ऑलिव्ह रिडले कासवांमुळे जगाच्या नकाशावर गेलेले वेळास किनाऱ्याला वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळणे ही उल्लेखनीय आणि गौरवाची गोष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत स्थळांचे जतन करण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य राहील.
- हेमंत सालदुरकर, ग्रामस्थ वेळास.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT