swt2119.jpg
00032
बांदाः वन्यजीव छायाचित्रकार सीताराम राऊळ यांना आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून देणारे रेडे घुमटातील वटवाघुळांचे छायाचित्र.
swt2120.jpg
00033
लंडन ः येथील चित्रप्रदर्शनात आपल्या छायाचित्रासोबत सीताराम राऊळ.
टीपः swt2121.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
00034
सीताराम राऊळ
बांद्यातील वटवाघळांची छबी लंडनच्या म्युझियममध्ये
घोटगेतील सुपुत्राचे छायाचित्रः ‘वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर २०२५’ स्पर्धेत सन्मान
नीलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः सोळाव्या शतकातील आदिलशाही राजवटीची साक्ष देणाऱ्या बांदा येथील ऐतिहासिक ''रेडे घुमट'' या पुरातन वास्तूतील फळखाऊ वटवाघळांचा थव्याची छबी आता लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झळकला आहे. मूळ घोटगेवाडी (ता. दोडामार्ग) येथील वन्यजीव छायाचित्रकार सीताराम राऊळ यांच्या ‘निसर्ग पुन्हा जागा मिळवतो’ या अप्रतिम छायाचित्राने जगातील सर्वात प्रतिष्ठित ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर २०२५’ या स्पर्धेत ‘अर्बन वाइल्डलाईफ’ या विभागात हा मानाचा सन्मान पटकावला आहे. बांद्यातील छायाचित्र जागतिक पातळीवर झळकल्याने हा संपूर्ण बांद्यासह कोकणासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. या स्पर्धेला जगभरातील तब्बल ११३ देशांतील ६६ हजार छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता.
वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रातील हा पुरस्कार म्हणजे फोटोग्राफी जगतातील ''ऑस्कर'' मानला जातो. अशा स्पर्धेत कोकणातील एका छायाचित्रकाराने जागतिक स्तरावर भारतीय झेंडा अभिमानाने फडकवला असून ही देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. रेडे घुमटच्या भग्नावशेषांतून सायंकाळी अन्नाच्या शोधात थव्याने बाहेर पडणाऱ्या व निशाचर असलेल्या वटवाघळांचा क्षण सीताराम यांनी अप्रतिमपणे कॅमेऱ्यात बंदिस्त केला आहे. पूर्ण अंधारात, वटवाघुळे कुठे उडतील, याचा अंदाज घेऊन त्यांनी कॅमेरा ''मॅन्युअली फोकस'' केला. फ्लॅशच्या प्रकाशात टिपलेला तो क्षण त्यांच्या संयम, तांत्रिक कौशल्य आणि निसर्गाशी एकरुपतेचे द्योतक ठरला.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम आणि फेसबुक यांच्यावतीने होणाऱ्या या स्पर्धेच्या ६१ व्या आवृत्तीत ‘निसर्ग पुन्हा जागा मिळवतो’ हे छायाचित्र ‘अर्बन वाइल्डलाईफ’ विभागात प्रदर्शित होणार आहे. यात जगभरातील नामवंत छायाचित्रकारांच्या कलाकृतींसोबत कोकणातील या छायाचित्रकाराची कलाकृतीही जागा मिळवते आहे, हा खऱ्या अर्थाने भारतासाठी गौरवाचा क्षण आहे. वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रात १३ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सीताराम यांनी या यशाने केवळ कोकणाचा नाही, तर संपूर्ण भारताचा अभिमान वाढवला आहे. ''आपली शहरे कितीही मोठी असली, तरी आपण ती सोडली की शेवटी निसर्ग आपली जागा पुन्हा मिळवतो.'' हा या छायाचित्रातून देण्यात आलेला संदेशही तितकाच प्रभावी आहे.
चौकट
कोकण ते लंडन
घोटगेवाडी या छोट्या गावचा सुपुत्र सीताराम राऊळ यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईत घेतले. बालपणापासूनच प्राणी-पक्ष्यांबद्दल आकर्षण असल्याने ते ''सर्पमित्र'' म्हणून प्राणिसेवेमध्ये सक्रिय झाले. जखमी प्राण्यांना जंगलात सोडताना त्यांच्या छायाचित्रांचे दस्तावेजीकरण करतानाच त्यांच्या फोटोग्राफी प्रवासाची सुरुवात झाली. त्यांनी ललित कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण प्रसिद्ध चित्रकार सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. रंगसंगती, प्रकाश-छाया आणि रचना यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी चित्रकला आणि छायाचित्रण या दोन्ही क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
चौकट
रेडे घुमटची प्रेरणा आणि अभ्यास
बांदा येथील आदिलशाही काळातील १६ व्या शतकातील ‘रेडे घुमट’ या पुरातन वास्तूने त्यांना बालपणापासूनच भुरळ घातली होती. या घुमटाच्या आत दिवसा आश्रय घेणारी वटवाघळे त्यांना नेहमीच कुतूहल वाटायची. कोविड काळात वटवाघळांविषयी निर्माण झालेल्या नकारात्मक धारणा आणि त्यावरील त्यांच्या स्वतःच्या अभ्यासातून त्यांनी या प्राण्यांचे छायाचित्रण करण्याचा संकल्प केला. सूक्ष्मजीव छायाचित्रणात हातखंडा असलेले सीताराम यांनी त्यानंतर सलग तीन वर्षे विविध ऋतूंमध्ये घुमटातील वटवाघुळ या सस्तन पक्ष्यांचा अभ्यास, त्यांची हालचाल, प्रकाशयोजना आणि तांत्रिक प्रयोग करून अखेर ‘तो’ क्षण कॅमेऱ्यात टिपला, जो आता जगभरात गाजतो आहे.
चौकट
वटवाघुळांच्या संरक्षणाचा संदेश
सीताराम यांच्या या कलाकृतीमुळे निसर्गात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या परंतु नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या वटवाघुळांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. या छायाचित्राने केवळ त्यांना जागतिक कीर्तीच मिळवून दिली नाही, तर निसर्गाच्या सहअस्तित्वाचा एक संवेदनशील संदेशही दिला आहे. त्यांच्या या छायाचित्रमुळे निसर्गात महत्त्वाचा वाटा असलेल्या वटवाघुळांसारख्या दुर्लक्षित प्राणीप्रजातीला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.
कोट
‘‘मी अंधारात काम करत होतो. वटवाघुळे माझ्यावर आणि कॅमेरावर अनियमितपणे विष्ठा टाकत होती. तरीही तो क्षण मिळवणे हेच माझे ध्येय होते. हे छायाचित्र काढत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अंधारात शेकडो वटवाघळांच्या सानिध्यात फोटोग्राफी करणे आणि त्याचवेळी स्वतःची सुरक्षा राखणे, ही एक मोठी परीक्षा होती आणि त्याच छायाचित्राने त्यांना आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून दिला. निसर्गाशी एकरूप झालो की कॅमेरा हा केवळ माध्यम ठरतो; बाकी सर्व निसर्ग स्वतः सांगतो.’’
- सीताराम राऊळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.