भाट्ये-राजिवडा रस्ता नव्याने करा
खासदार राणेंच्या पालिकेला सूचना ; बिजली खान यांच्या मागणीची दखल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ः भाट्ये पुलावरून राजिवड्यात जाणाऱ्या शहर विकास आराखड्यातील रस्ता नवीन व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप अल्पसंख्यांक मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्षांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे जनता दरबारात केली. राणे यांनी यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी अशा सूचना रत्नागिरी नगरपालिकेला दिल्या आहेत.
रत्नागिरी शहरातून पावसकडे जाणाऱ्या मार्गावर भाट्ये पुल सुरू होतो, तिथे राजिवड्यात जाण्यासाठी रस्ता आहे. शहर विकास आराखड्यात समाविष्ट असलेला हा रस्ता नव्याने व्हावा याकडे दुर्लक्ष झाले होते. याबाबत अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी खासदार राणे यांच्या जनता दरबाराद्वारे लक्ष वेधले. हा रस्ता झाल्यानंतर राजीवड्यातील रहिवाशांसह काशिविश्वेश्वर मंदिरात विविध उत्सव आणि इतरवेळी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सोयीचे होईल. तसेच राजिवड्यातील अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात तातडीने नेण्यासाठी आणि गावात आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन तातडीने घटनास्थळी मदत होवू शकणार आहे. शहर विकास आराखड्यात भाट्ये ब्रिज ते राजिवडा परिसर व काशिविश्वेश्वर मंदिराला जोडणाऱ्या सुमारे ९ ते १० मीटर रस्त्याचे काम गेल्या २५ ते ३० वर्षांपासून दुर्लक्षित राहिले आहे. यापूर्वीही अब्दुल बिजलीखान यांनी जिल्हा प्रशासनासह रत्नागिरी नगरपालिकेकडे या रस्त्यासाठी अर्ज केले. परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खासदार राणे यांच्या जनता दरबारात निवेदन देवून या रस्त्याकडे लक्ष वेधले. खासदारांनी यासंदर्भात नगरपालिकेला योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
---
नागरिकांना दिलासा
भाट्ये-राजिवडा रस्ता नव्याने झाल्यास येथील रहिवाशांसह काशिविश्वेश्वर मंदिरात विविध उत्सव आणि दर्शनासाठी भाविकांची सोय होणार आहे. त्याचबरोबर रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून आपत्तीजन्य परिस्थितीत आवश्यक ती मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.