खेडमध्ये महायुती, आघाडीमध्ये संभ्रम
जागावाटपाबाबत चर्चाच नाही; रिपाइं, मनसे, बसपामध्ये हालचाली
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : खेड पालिकेची निवडणूक जाहीर झाली असली तरी ही निवडणूक एकत्रित लढवायची की, स्वबळावर याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. निवडणूक जाहीर होऊनही सद्यःस्थितीत महायुती व आघाडीत जागावाटपाची कोणतीच बोलणी झालेली नाही. महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपाची चर्चाच नाही; मात्र रिपाइं, मनसे, बसपा आणि इतर छोट्या पक्षांनीही या निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खेड पालिकेत नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण पडल्यामुळे चुरस वाढणार आहे. निवडणुकीत असलेल्या १७ नगरसेवकांच्या संख्येत ३ ने वाढ झाली असून, आता १० प्रभागात एकूण २० नगरसेवक शहराचा कारभार हाकणार आहेत. मागील २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वात जास्त म्हणजे १० नगरसेवक निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ७ नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे ३ व मनसेचे ४ नगरसेवक होते; मात्र थेट झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेले मनसेचे वैभव खेडेकर यांनी शिवसेना उमेदवार बिपिन पाटणे यांचा पराभव करून बाजी मारली होती. दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी होऊन बाळा खेडेकर विरुद्ध सुनील दरेकर यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे कास्टिंग व्होट मिळवून बाजी मारली होती; मात्र आता खेडेकरच भाजपमध्ये गेल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
--------
चौकट
लवकरच निर्णयाची शक्यता
निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लवकरच चर्चेच्या फेरी सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.