02456
नगरपंचायत ‘पैसे छापण्याचा कारखाना’
चंद्रकांत कावले ः देवगडमध्ये प्रशासनाने कारभार सुधारावा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः देवगड जामसंडे नगरपंचायत म्हणजे ‘पैसे छापण्याचा कारखाना आहे’, अशी शहरातील जनतेमध्ये तिखट प्रतिक्रिया असल्याचे भाजपचे स्विकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सांगुन अप्रत्यक्षपणे जणू घरचा आहेरच दिला. याला नगराध्यक्षांनी आक्षेप घेताच, हे माझे मत नसून जनतेचे म्हणणे असल्याचे सांगून यामुळे शहराचे नाव खराब होत असल्याने प्रशासनाने यामध्ये सुधारणा करावी असेही त्यांनी सांगितले. शहराचा प्रारुप विकास आराखडा बनवण्यासाठी अदा केलेल्या रक्कमेवरुनही त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात झाली. मंचावर प्रभारी मुख्याधिकारी गौरी पाटील, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, नगरसेवक शरद ठुकरूल, प्रणाली माने आदी उपस्थित होते. शहरातील नव्याने बांधलेल्या एका रस्त्यावरील पुलाच्या संदर्भात यापूर्वी तक्रार करूनही संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले. यावरून त्यांनी प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाला जनतेचे काही देणे घेणे नाही अशा शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले.
येथील देवगड-जामसंडे शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी दिलेल्या देयकावरून श्री. कावले यांनी कोणत्या कालावधीत किती रक्कम दिली गेली याची माहितीच मागवली. यावर प्रशासनाने आराखड्याच्या अनुषंगाने शहरातील अस्तित्वातील जमीन वापर नकाशा तयार करणे, त्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणे या अनुषंगाने मार्च २०१८ च्या सभेतील ठरावानुसार मंजुरी दिली होती. त्याला तांत्रिक मान्यता मिळून डिसेंबर २०१८ मध्ये सुमारे ९९ लाख २६ हजार ५५ रुपये इतक्या रक्कमेला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानुसार एप्रिल २०१९ पासून नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विविध चार टप्प्यांत एकूण सुमारे ७२ लाख १७ हजार ५१६ रुपये एवढ्या रक्कमेची संबंधित एजन्सीला देयके अदा केल्याची माहिती प्रशासनाने दिली. या कालावधीत कोण नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी होते याचीही माहिती प्रशासनाने दिली. यावरुन कोणाच्या काळात ही देयके अदा केली याची चर्चा सभागृहात झाली. या अनुषंगाने केलेल्या सर्वेक्षणावेळी पंचयादी घातली होती का? असा प्रश्नही श्री. कावले यांनी केला. अधिकारी वेळ मारून नेतात मात्र जनतेशी त्यांना काही घेणं घेणं नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली. संबंधित ठेकेदार संस्थेकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाप्रमाणे न दिलेल्या फरकाबाबत चर्चा झाली. तसेच नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांचा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन अभ्यास दौरा आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली. शहरातील विविध विकासकामांबाबत विषय ठेवला होता त्यावरही चर्चा झाली.
.................
‘डस्टबिन कुठे दिसेनात’
शहरासाठी आलेले डस्टबिन तसेच चाकाचे ढकलण्याचे डस्टबिन शहरात कुठे दिसत नसल्याचा मुद्दा नगरसेविका प्रणाली माने यांनी उपस्थित केला. कचराकुंड्या स्वच्छता मुकादमांच्या ताब्यात दिल्या होत्या, असे प्रशासनाने सांगितले. तर पाऊस लांबल्याने पुन्हा रस्त्याकडेला उगवलेले रान कापावे, अशी सूचना नगरसेवकांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.