गावठण-भराडवाडी रस्ता धोकादायक
एसटी वाहतूक असुरक्षित ; फेऱ्या बंद करण्याचा आगाराचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : चिपळूण-सापिर्ली मार्गावरील गावठण ते भराडवाडीदरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, एसटी वाहतूक अत्यंत असुरक्षित बनली आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास सापिर्ली मार्गावरील सर्व एसटी फेऱ्या भराडवाडीपर्यंतच मर्यादित करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा चिपळूण आगार प्रशासनाने दिला आहे.
चिपळूण-सापिर्ली मार्गावरील बससेवा काही काळापूर्वी रस्ता खराब असल्यामुळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने दुरुस्ती झाल्याची माहिती आगाराला दिली होती; परंतु अलीकडे करण्यात आलेल्या पाहणीत रस्त्यावरील खड्डे नीट बुजवलेले नसल्याचे आणि रस्ता अजूनही धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या मार्गावरून एसटी वाहतूक करणे सुरक्षित नाही, असे आगार प्रशासनाने म्हटले आहे. तसेच रस्ता पूर्णपणे दुरूस्त करून योग्य स्थितीत आणावा अन्यथा बसफेऱ्या फक्त भराडवाडीपर्यंतच चालवल्या जातील, असे पत्राद्वारे सापिर्ली ग्रामपंचायतीला कळवण्यात आले आहे.