मंडणगडमध्ये राजकीय गणितांचा जुगाड सुरू
युतीचे गणित गुंतागुंतीचे; तिकीट वाटपावर अंतिम समीकरण, इच्छुकांच्या हालचाली
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वी राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. युती किंवा आघाडीबाबत कोणतेही स्पष्ट चित्र नसल्याने उमेदवारांची धावपळ वाढली आहे. विजयाची शक्यता अधिक असलेल्या गटातून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी पडद्यामागील चाचपणीस वेग दिला असून, विविध पक्षांतील नेत्यांमध्ये सध्या राजकीय गणितांची उकल सुरू आहे.
२०१७च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्या वेळी तालुक्यातील राजकीय समीकरणांचे खरे चित्र समोर आले होते. अनेक पक्षांचे कामकाज नसल्याचे उघड झाले आणि काही नव्या गटांनी स्थानिक पातळीवर पकड निर्माण केली. या निवडणुकांनंतर तालुक्यातील राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सध्या तालुक्यात शिंदेगटाची शिवसेना इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते; मात्र, या पक्षाने मित्रपक्षांसोबत युती करायची की, स्वतंत्रपणे लढायचे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे केवळ इतर पक्षच नव्हे तर इच्छुक उमेदवारही वेटिंग गेममध्ये आहेत. जर शिंदे शिवसेनेने युती टाळली तर उरलेले पक्ष व गट एकत्र येऊन निवडणूक प्रभावी करण्याचा प्रयत्न करतील, अशा प्राथमिक हालचाली पडद्यामागे सुरू झाल्या आहेत. तथापि, भिन्न विचारधारा आणि कार्यपद्धती असलेल्या या गटांची नवीन रचना कशी होईल, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
---
चौकट
भाजप, काँग्रेसचे अस्तित्व कमी
तालुक्यातील पारंपरिक भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पातळीवरील पक्ष असले तरी स्थानिक स्तरावर त्यांची संघटनशक्ती कमी झाल्याचे दिसते. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन स्थानिक प्रभावी पक्षांचे चार गटांत विभाजन झाल्याने मतविभाजन अधिक वाढले आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडे नेमके ‘कोअर व्होटबँक’ आहे याबाबत राजकीय विश्लेषकांनाही संभ्रम आहे. या नवीन रचनेचे खरे चित्र फक्त निकालानंतरच स्पष्ट होईल, असे मानले जाते.
चौकट
नगरपंचायत निवडणुकीने दिला अनुभव
अलीकडच्या नगरपंचायत निवडणुकीत शिंदेगटाच्या विरोधात इतर सर्व पक्ष एकत्र आले होते. त्या लढतीतून शिंदे शिवसेनेने संघटनशक्ती आणि संघटित रणनीती दाखवून दिली. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेना कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्रपणे मैदानात उतरण्यास तयार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
चौकट
तिकिटासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा
शिंदे शिवसेनेच्या गोटात उमेदवारीसाठी प्रचंड रस आहे. इच्छुक उमेदवार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे उबाठा गट (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अद्याप आपले पत्ते उघड करायला तयार नसल्याने इतर पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी दिवसांत कोणकोणत्या गटातून रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
चाचपणी मोहीम वेगात
तालुक्यातील राजकारण सध्या पडद्यामागील बैठका, गुप्त भेटी आणि नव्या समीकरणांच्या चर्चांनी तापलेले आहे. विजयाची हमी देऊ शकणाऱ्या गटाच्या शोधात असलेले इच्छुक उमेदवार चाचपणी मोहीम वेगात करत असून, कोण कोणाला साथ देणार, कोणाचा हात सोडणार, यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.