- rat६p१.jpg-
२५O०२७२८
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद येथील श्री लक्ष्मीकेशव देवस्थानच्या कार्तिकी उत्सवात उत्सवी नाट्यस्पर्धेतील अश्रूंची झाली फुले नाटकातील एक क्षण.
‘अश्रूंची झाली फुले’ने रंगली उत्सवी रंगभूमी
वाटद नाट्य संस्थेला प्रयोगाचा पहिला मान ; रसिकांची दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेतर्फे नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची स्पर्धा २०२५-२६ दसऱ्याच्या दिवशी उद्धोषित करण्यात आली होती. या नाटकाचा प्रारंभाचा प्रयोग तालुक्यातील वाटद येथील श्री लक्ष्मीकेशव देवस्थानच्या कार्तिकी उत्सवात ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाने रंगतदार झाला.
उत्सवी रंगभूमी म्हणजेच पारावरच्या नाटकांसाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि विशेष अभ्यासाने गतवर्षीपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा-रत्नागिरीतर्फे आयोजित करण्यात येते. यावर्षी दसऱ्याच्या दिवशीच उद्घोषित झाली होती. या स्पर्धेतील पहिला नाट्यप्रयोग मंगळवारी (ता. ४) वाटद येथील श्री लक्ष्मीकेशव देवस्थानच्या कार्तिक उत्सवात अश्रूंची झाली फुले या नाटकाने रंगला.
वाटद येथील या उत्सव मंडळाचा इतिहासदेखील ९० वर्ष जुना आहे. तितकीच जुनी नाट्यपरंपरा हे मंडळ जपत आहे. यावर्षी उत्सवी नाटकाचा प्रथम प्रयोगाचा मानही या मंडळाला मिळाला आहे. वाटद येथील कलाकारांचा अभिनय, नेपथ्य अशा चारही बाजूंनी हे नाटक रंगतदार झाले. उत्सवी नाटकांच्या स्पर्धेच्या नियमानुसार, दोन मान्यवर परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी अनुया बाम आणि श्रीकांत पाटील यांनी काम पाहिले तर नाट्य परिषदेच्यावतीने या वेळी कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, खजिनदार सतीश दळी, कार्यवाह वामन कदम, सहकार्यवाह, स्पर्धाप्रमुख अमेय धोपटकर, संतोष सनगरे, अॅड. रजनी सरदेसाई, अॅड. श्रीकांत भाटवडेकर, विजय पोकळे आदी सदस्य उपस्थित होते.
----
चौकट
गतवर्षी ४७ नाटकांचे सादरीकरण
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धेत गतवर्षी सलग सहा महिने चालली. या नाट्यस्पर्धेला देशभरातील एकमेव नाट्यस्पर्धा असा नावलौकिक प्राप्त झाला आहे. गतवर्षी या स्पर्धेत ४७ उत्सवी नाटकांचे यशस्वी सादरीकरण झाले होते.