- rat६p५.jpg -
२५O०२७३२
संगमेश्वर ः कुणबी समाजाच्या आंबेडखुर्द येथे बैठकीला उपस्थित बांधव.
--------------
हेवेदावे बाजूला ठेवून एकजूट दाखवा
संतोष थेराडे ः कुणबी समाज बांधवांची आंबेडखुर्द येथे बैठक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः समाजासाठी एकत्र येऊन काम करणे अत्यंत गरजेचे आहे. कुणबी मोर्चा यशस्वी झाला; पण अद्याप मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही. गेल्या चार वर्षांपासून निवडणुका न घेता कोट्यवधी रुपयांचा निधी गोठवला गेला. आता कुणबी समाजातील भांडणे बाजूला ठेवून एकजूट दाखवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांनी केले.
कुणबी समाजाच्या आरक्षण हक्कासाठी आणि समाजऐक्याच्या उद्देशाने आंबेडखुर्द येथील कुणबी भवनात कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्यावतीने भव्य आभार आणि नवी दिशा सभा आयोजित करण्यात आली. या सभेला तालुक्यातील आणि जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहून एकीचा संदेश दिला. या वेळी कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, सुरेश भायजे, सहदेव बेटकर, अविनाश लाड, नितीन लोकम, रोशन पाटील, संदीप गीते आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी नितीन लोकम यांनी ही सभा कुणबी समाजाच्या निर्धाराची असून, समाजासाठी सर्वजण एकत्र लढण्यासाठी घेण्यात आली आहे तर सहदेव बेटकर म्हणाले, कोणताही पक्ष असो; पण तो कुणबी असावा. थेराडे यांच्या पाठीशी सदैव उभा राहेन, असे आश्वासन त्यांनी दिले तसेच कुणबी सभेला उपस्थित अनिल नवगणे यांनी समाजबांधवांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, कुणबी समाजाने एकत्र येऊन दाखवलेली ताकद अभिमानास्पद आहे. समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकदिलाने पुढे येणे आवश्यक आहे. तोडा-मोडा-राज्य करणाऱ्यांना आता जागा नाही. कुणबी आरक्षणावर दुसऱ्या कुणाचाही हक्क चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.