swt68.jpg
02767
म्हापणः त्रिपुरारी पौर्णिमा श्री देवी शांतादुर्गा व श्री देव सिद्धेश्वर पालखी मिरवणूकीत भाविकांची झालेली गर्दी.
swt69.jpg
02768
म्हापण ः मंदिर परिसरात ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
म्हापणमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा जल्लोष
भाविकांची गर्दीः शांतादुर्गा, सिद्धेश्वर देवस्थान परिसरात भक्तीमय वातावरण
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ११ः येथे ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवीचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ४ व ५ या दोन रात्री चाललेल्या या उत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावात गुढीपाडव्यांनंतर साजरा होणारा हा दुसरा मोठा उत्सव मानला जातो.
उत्सवाची सुरुवात जामखान्यातून देवीची उत्सव मूर्ती बाहेर काढून पालखी मिरवणुकीने करण्यात आली. शांतादुर्गा मंदिर, श्री देव सिद्धेश्वर मंदिर तसेच म्हापण बाजारपेठ परिसर आकर्षक रोषणाई, आकाशकंदील आणि पारंपरिक पणत्यांनी दैदिप्यमान झाला होता.
श्री विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंतच्या मार्गावर पारंपरिक पद्धतीने बांबूवर शेणाच्या गोळ्यांवर पणत्या चिकटवून दिव्यांची लखलखाट केली होती. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी दीपप्रज्वलनासह विद्युत रोषणाईचे अप्रतिम दृश्य अनुभवायला मिळाले. रस्त्यांवर चुन्याची आणि रंगांची सजावट, केळी–पोपळीच्या पानांच्या कमानी, तसेच रंगीत रांगोळ्यांनी गाव सजले होते. या दरम्यान शिव–शक्तीच्या स्वरूपात देवी शांतादुर्गा आणि देव सिद्धेश्वर यांच्या मूर्ती पालखीत विराजमान झाल्या. भक्तीभावाने तयार केलेल्या देखाव्यांमध्ये उज्जैनचे श्री महाकालेश्वर शिवलिंग, कोल्हापूरची श्री देवी अंबाबाई, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यपूर्ण देखावा विशेष आकर्षण ठरले.
विठ्ठल रखुमाई मंदिरात पालखी पोहोचल्यावर वेदोक्त पद्धतीने पूजा, पुराण वाचन, किर्तन आणि पारंपरिक लळीत नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. पहाटे पारंपरिक गोपाळकाला खेळ रंगला ज्यामध्ये तब्बल १७ खेळ खेळले गेले. खेळानंतर भाविकांनी नदीवर स्नान करून देवपूजन, नैवेद्य व महाआरती केली. सकाळी सुमारास पालखी पुन्हा शांतादुर्गा मंदिराकडे रवाना झाली. सायंकाळी पुन्हा मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या. नंतर पालखी सिद्धेश्वर मंदिरात पोहोचून दीपमाळेवर कुवाळा ठेवून पूजन करण्यात आले. या वेळी पारंपरिक नृत्य, ओटी भरण्याचे कार्यक्रम आणि महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. अवकाळी पावसाची शक्यता असतानाही पावसाने विश्रांती घेतल्याने संपूर्ण उत्सव निर्विघ्नपणे आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.