swt1318.jpg
04131
शिरोडा ः येथील खटखटे ग्रंथालयातील द्वैमासिक संगीत सभेत गायिका ममता प्रभू आजगावकर व सोबत अन्य.
ममता प्रभूआजगांवकरांच्या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध
खटखटे ग्रंथालयात प्रारंभः द्वैमासिक संगीत सभेस उत्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे सार्वजनिक ग्रंथालयात द्वैमासिक संगीत सभेचा प्रारंभ ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यवाह सचिन गावडे, सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ. श्रीराम दीक्षित, साहित्यिक विनय सौदागर, निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर, व्यावसायिक जनार्दन पडवळ तसेच शुभारंभी मैफलीचे कलाकार उपस्थित होते. उद्घाटनानंतर झालेल्या शुभारंभाच्या मैफलीत आजगांव येथील नवोदित गायिका ममता प्रभू आजगांवकर यांनी “सुंदर ते ध्यान”, “याजसाठी केला होता अट्टाहास”, “वेढा रे वेढा” हे अभंग, “वृंदावनी वेणू” ही गवळण आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही पुरंदरदासांची रचना सादर करत “सावळे परब्रह्म आवडे या जीवा” या भैरवी रागातील बंदिशीने मैफलीची सांगता केली.
या मैफलीला नरेश नागवेकर (संवादिनी), गणपती भट (तबला) आणि शिशीर प्रभू (मंजिरी) यांनी सुंदर साथसंगत केली, तर युसूफ आवटी यांनी ध्वनिसंयोजन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. श्रीराम दीक्षित यांनी स्वागत व प्रास्ताविक करत कलाकारांचा परिचय करून दिला. होतकरू आणि नवोदित कलाकारांना मंचावर सादरीकरणाचा अनुभव मिळावा, मैफल रंगविण्याचे तंत्र शिकावे आणि सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने द्वैमासिक संगीत सभा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यांनी आपल्या मनोगतात काही वर्षांपूर्वी खटखटे ग्रंथालयात सुरु असलेल्या संगीत सभेच्या आठवणी जाग्या झाल्याचे सांगत, या उपक्रमाचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल ग्रंथालय पदाधिकारी व सभेचे समन्वयक डॉ. दीक्षित आणि विनय सौदागर यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे गजानन मांद्रेकर यांनी आपल्या जीवनाशी संगीताचे असलेले घट्ट नाते सांगत, “संगीत प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय झाला पाहिजे,” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात राजन शिरोडकर यांनी गुलाबपुष्प देऊन कलाकारांचा सन्मान केला. संपूर्ण संगीत सभेचे सूत्रसंचालन विनय सौदागर यांनी केले. या प्रारंभाच्या संगीत सभेला शिरोडा, आरवली आणि आजगाव परिसरातील अनेक संगीतप्रेमी रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.