- rat१३p७.jpg-
P२५O०४१४१
कुर्डूवाडी : अतिवृष्टी, महापुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना हेल्पिंग हॅंड्सद्वारे मदतीचा धनादेश देताना कौस्तुभ सावंत, शिरीष सासणे आणि संजय वैशंपायन आदी.
हेल्पिंग हँड्सद्वारे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत
माढा तालुका; २० गावांतील १२८ विद्यार्थी गहिवरले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडाला. या पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी रत्नागिरीतील विविध सामाजिक संस्थांचे फोरम असलेल्या हेल्पिंग हॅंड्सने पुढाकार घेतला आणि यातून जमा झालेल्या ७ लाख ६५ हजार रुपयांची मदत कुर्डुवाडी गावातील १२८ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. या मदतीमुळे विद्यार्थी गहिवरले आणि पालकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
आज हेल्पिंग हॅंड्सतर्फे विवा एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित पत्रकार परिषदेत कौस्तुभ सावंत, जयंतीलाल जैन, शिरीष सासणे, प्रमोद खेडेकर, राजू भाटलेकर, नंदू चव्हाण, भूषण बर्वे, संजय वैशंपायन आदींनी या संबंधी विस्तृत माहिती दिली. जमा झालेल्या प्रत्येक रुपयांचा सर्व हिशेबही त्यांनी पारदर्शकपणे मांडला.
अतिवृष्टी झाल्यानंतर कोणत्या प्रकारची मदत हवी या संबंधी माहिती घेण्यात आली. शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांना मदत मिळणार होती; पण वस्तुरूप मदतीऐवजी धनादेश स्वरूपात विद्यार्थ्यांना मदत होण्याची गरज लक्षात घेऊन ही मदत नुकतीच वितरित करण्यात आली. हेल्पिंग हॅंड्सच्या मदतीच्या सादेला रत्नागिरीवासियांचा प्रतिसाद मिळाला. यात करसल्लागार संघटनेने जवळपास एक लाख रुपयांचे धनादेश विद्यार्थ्यांना दिले. एकूण १२८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार ८०० रुपयांप्रमाणे ७ लाख ६५ हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे दिली. दुष्काळी नदी म्हणून ओळखली जाणारी सीना नदी कोपली आणि महापुराने माढा तालुक्यातील वीस गावे बाधित झाली. मागील सत्तर वर्षात एकदाही या या नदीला पूर आला नव्हता. लोकांना पुराच्या पाण्याचा अंदाज नसल्याने अधिक नुकसान झाले.
चौकट १
अशी केली मदत
रत्नागिरीपासून दूरवर असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करणे कठीण कामगिरी होती. यासाठी टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र कदम दुवा ठरले. वल्लभ वणजू यांच्या संपर्कातून प्राचार्य कदम यांनी कुर्डुवाडीसारख्या दुर्गम पूरग्रस्त झालेल्या गावाच्या नुकसानाची सविस्तर माहिती गोळा केली. सीना नदीकाठील लहान-मोठ्या वीस गावातील विविध महाविद्यालयांतून गरजू विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली. यासाठी डॉ. आशिष राजपूत, माध्यम प्रतिनिधी किरण चव्हाण, प्राचार्य नितीन उबाळे आदी स्थानिकांनी सहकार्य केले. यामुळे आर्थिक मदतीचा योग्य विनियोग करता आल्याचे हेल्पिंग हॅंड्सच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.