04309
कणकवलीत उद्या महाबोधी महाविहार मुक्ती परिषद
श्यामसुदर जाधव ः परिषदेला एक हजारहून अधिक नागरिक उपस्थित राहणार
कणकवली, ता. १४ ः महाबोधी महाविहार मुक्त व्हावे तसेच १९४९ चा टेम्पल कायदा रद्द व्हावा, या मागणीसाठी महाबोधी महाविहार आंदोलन जनजागृती अभियान राबवले जात आहे. त्याअनुषंगाने कणकवलीत रविवारी (ता.१६) बुद्धविहार येथे महाबोधी महाविहार मुक्त परिषद होणार आहे, अशी माहिती दी बुद्धीस्ट फेडरेशन आॅफ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्यामसुदर जाधव यांनी दिली.
येथील बुद्धविहारात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जाधव बोलत होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, दी बुद्धीस्ट फेडरेशन आॅफ सिंधुदुर्ग पदाधिकारी संदीप कदम, अंकुश कदम, अॅड. सुदीप कांबळे, संजय कदम, लुकेश कांबळे हे उपस्थित होते. जाधव म्हणाले, ‘या परिषदेला दिल्ली येथील भंते विनायार्च हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय मुख्य समन्वयक राजेश पवार, रवींद्र हिरोळे, सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती आहे. परिषदेसाठी गोवा व सिंधुदुर्गातून १००० हून अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत.’
श्री. जाधव म्हणाले, ‘तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते पवित्र स्थळ म्हणजे बिहारमधील बोधगयाचे महाविहार. हे पवित्र स्थळ जगभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, या श्रद्धास्थानाचे पावित्र्य आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. १९४९ च्या बोधगया मंदिर कायद्यातील बौद्ध विरोधी तरतुदीने महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन शैव पंथीय हिंदूंच्या ताब्यात दिले आहे. ते पुन्हा बौद्धांकडे देणे गरजेचे आहे.’ राजेश पवार, रवींद्र हिरोळे, सुभाष जाधव, सुमेध किरवले, अॅड. राहुल किरवले, अॅड. राहुल लहासे, प्रकाश कांबळे, गोव्यातील मिलिंद भाटे, अशोक खावणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
--
...म्हणून आंदोलन!
जगभराच्या बौद्धांसाठी पवित्र स्थान असलेल्या बिहारमधील महाबोधी महाविहारावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी भारतासह जगभरातील बौद्ध बांधव संघटितपणे लढा देत आहेत. १९४९ चा अन्यायकारक बोधगया टेम्पल कायदा रद्द करून महाबोधी महाविहाराचे पावित्र्य व व्यवस्थापन पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावे ही मागणी घेऊन महाबोधी महाविहार मुक्त व्हावे, १९४९ चा टेम्पल कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी विहार मुक्त आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील बौद्ध बांधव शांतनेने आंदोलन करीत आहेत.