‘पोक्सो’विषयी शाळांमध्ये जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ ः मुलांवरील अत्याचार, पोक्सो या सारख्या गंभीर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जनजागृती करण्यासाठी बाल कल्याण समितीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आवाशी, कुडोशी व सुकदर या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये कायदेविषयक व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
खेड तालुका अधिवक्ता परिषद व खेड पोलीस ठाणे तसेच बाल कल्याण समिती यांच्या सहकार्याने कुडोशी जिल्हापरीषद शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम झाला. अधिवक्ता परिषद कोकण प्रांत रत्नागिरी जिल्ह्याचे सहसचिव अधिवक्ता सिद्धेश बुटाला यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली. अधिवक्ता परिषद कोकण प्रांत खेड तालुका संघटन आयाम मंत्री अधिवक्ता स्वप्नील खोपकर यांनी या कार्यक्रमात बाल हक्क व्यवस्था व पॉक्सो कायदा या विषयावर उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच लहान मुलांना कायदा म्हणजे काय?, आजू बाजूच्या परिसरात मुलांनी कसे वागावे तसेच मुलांना चांगले-वाईट स्पर्श ओळखण्याची समज, शिक्षक बालक आणि विद्यार्थी किंवा मुलं यांच्यामधील आवश्यक असलेला सुसंवाद इत्यादी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आवाशी येथील पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष संदीप गमरे यांनी मुलांना स्वयं संरक्षण कसे करावे यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर खेड तालुका आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. श्रीधर भिलवडे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शनातून उपस्थितांना लैंगिक अत्याचार व त्याचे समाज आणि लहान मुलांवर होणारे परिणाम याविषयी उदाहरणासह माहिती दिली. यावेळी अधिवक्ता परिषद कोकण प्रांत खेड तालुका यांचेकडून शाळेतील मुलांना फळ वाटप करण्यात आले.