05420
विकासकामांच्या बाबतीत
सावंतवाडी मृतावस्थेतच
डॉ. परुळेकर; राजकीय पक्षांवर टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः येथील पालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष उतरले आहेत. मात्र, विकासाच्या दृष्टीने पाहता कुडाळ, तारकर्ली, देवबाग या भागाचा विकास होत असताना सावंतवाडी शहर मात्र विकासाच्याबाबतीत मृतावस्थेत आहे. एकाही पक्षाकडे विकासाचे व्हिजन नसून राजकारण करणारे लोक मात्र श्रीमंतीकडे चालले आहेत, अशी टीका डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली.
श्री. परूळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘सिंधुदुर्गसह राज्यात नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. देशभरात निवडणूक आयोगाचा सुरू असलेला गोरक धंदा राज्यातही सुरू आहे. येथील पालिकेच्या निवडणुकीमध्ये सावंतवाडीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या चर्चांना उधाण आहे; मात्र, विकासाच्या प्रश्नावर कोणीच बोलताना दिसत नाही. या ठिकाणी कोणाकडे विकासाचे व्हिजन नाही. आज कुडाळ शहर विकासाच्या दिशेने चालले आहे. देवबाग, तारकर्लीचाही विकास होत आहे. मात्र, सावंतवाडीचे काय? रेल्वे मार्ग, महामार्ग बाहेरून गेल्याने सावंतवाडी वाऱ्यावर पडली आहे. वेंगुर्लेसारखी सावंतवाडीही आज विकासाच्या बाबतीत मृतावस्थेत आहे. केवळ येथील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्समध्ये वाट वाकडी करून पर्यटक जेवण्यासाठी येतात.’
ते पुढे म्हणाले, ‘येथील मोती तलाव, नरेंद्र डोंगर यामुळे ही सुंदरवाडी आहे. तिला अधिक सुंदर बनवण्याचे काम इतर राज्यकर्त्यांचे होते. सत्तेच्या जोरावर गेली २० वर्षे पर्यटन महोत्सव घेतले गेले. मात्र, या ठिकाणी पर्यटन वाढले का? हा विचार करणे गरजेचे आहे. मुळात ते पर्यटन महोत्सव नव्हे तर ते राजकीय महोत्सव होते. पर्यटनाच्या नावाखाली येथील जनतेला फक्त गाजर दाखवण्याचे काम करण्यात आले.’
--------------
राजकारण करणारेच श्रीमंत
आज बिहारप्रमाणे या ठिकाणीही लोकांचे पलायन सुरू आहे. जवळपास १७०० ते १८०० लोकांनी आपली नावे मतदार यादीतून काढून दुसरीकडे समाविष्ट केली आहेत. ही धोक्याची घंटा आहे. इथले लोक रोजगारासाठी स्थलांतरीत झाले आहेत. मात्र, रोजगाराच्या नावाखाली राजकारण करणारे लोक या ठिकाणी श्रीमंत झाले. त्यामुळे केवळ मटक्यावर धाडी टाकून इथली परिस्थिती बदलणार नाही, असेही श्री. परुळेकर यावेळी म्हणाले.