गोगटे महाविद्यालयाचा
वॉकेथॉन उपक्रमात सहभाग
रत्नागिरी, ता. २२ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आयोजित वॉकेथॉन उपक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक आणि परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी सुरक्षित वाहतूक, हेल्मेटचा वापर, सीटबेल्टचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातमुक्त समाजाबाबत जनजागृती करण्यात आली.
जयस्तंभ आणि मारूती मंदिर येथे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी रस्ता सुरक्षाविषयक पथनाट्य सादरीकरण करून जाणीवजागृतीचा संदेश दिला. आपले प्रियजन सुरक्षित राहावेत तसेच वाहतूक नियमांचे पालन केले जावे यासाठीच संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. प्रतिवर्षी नोव्हेंबरचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येतो.
जयस्तंभ ते मारूती मंदिर व मारूती मंदिर ते जयस्तंभ असा वॉकेथॉनचा मार्ग होता. मोटारवाहन निरीक्षक राजश्री पाटील, निरीक्षक गजानन कोळी, निरीक्षक केतन पाटील, सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक मोहसीन आवटी, सहाय्यक निरीक्षक सत्यवंत पाटील, अक्षय पाटील, इंद्रजित मोहिते, गणेश नाचणकर, किरण दावलकर, राधा बसणकर, प्रा. सचिन सनगरे आणि विद्यार्थ्यांनी फलक व बॅनर्सच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती दिली.