सायकल स्पर्धेत चमकली चिपळूणची युवा जोडी
अहमद अली शेख, राघव खर्चे यांचे यश ; काश्मीर ते कन्याकुमारी अंतर पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : काश्मीर ते कन्याकुमारी सुमारे चार हजार किमीच्या सायकल स्पर्धेत चिपळूण सायकलिंग क्लबचे अहमद शेख आणि राघव खर्चे सहभागी झाले होते. त्यांनी १६ दिवसात हे अंतर पार केले. त्याशिवाय अनेक स्पर्धकांचे पंक्चर काढून दिले अनेक रायडर्सना मौलिक सूचना देत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने आयोजित सायकल स्पर्धेत चिपळूणच्या स्पर्धकांनी देशाचे लक्ष वेधून घेतले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार व फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीर ते कन्याकुमारी अशी ४००० किमी हून अधिक लांब अंतराची सायकल मोहीम आखण्यात आली होती. देशभरातून १५० सायकलस्वारांची कठोर निकष लावून निवड करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी चिपळूणमधून अहमद अली शेख आणि राघव खर्चे यांची निवड करण्यात आली होती. १ नोव्हेंबरला श्रीनगर येथून झेंडा दाखवून मोहिमेला सुरुवात झाली. जम्मू, दिल्ली, जयपूर, उदयपूर, गोध्रा मार्गे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत प्रवास करीत सर्व सायकलस्वारांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यानंतर धुळे-सोलापूरमार्गे बंगलोर व पुढे कन्याकुमारी येथे पोचल्यानंतर मोहिमेची समाप्ती झाली. कन्याकुमारी येथे पोहोचल्यावर विवेकानंद केंद्र परिसरात सर्व सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र व पारितोषक देण्यात आले. एकूण सोळा दिवसांत दररोज २५० हून अधिक किमी प्रवास करीत नऊ राज्यांमधून ४००० हून अधिक किमीचा प्रवास सर्व सायकलपटूंनी केला. अहमद शेख आणि राघव खर्चे यांनी यापूर्वी एस. आर., १२०० किमी एल. आर. एम असे विक्रम केले असून अहमद शेख यांनी यासोबतच ट्रिपल एस आर, एव्हरेस्टिंग, डेक्कन क्लिफहँगर रेस (रॅम क्वालिफायर), टायगरमॅन स्पर्धां, लहानमोठ्या सायकल स्पर्धेमध्ये आपले नाव कोरले आहे.
चौकट
प्रतिकूल परिस्थितीचा सामना
थंडी, वारा, कडक उन्हाचा सामना करताना अनेकांना सायकल मधील बिघाडांचा पण सामना करावा लागला. चिपळूण सायकलिंग क्लबच्या अहमद शेख यांनी किमान २६ जणांना पंक्चर काढून दिले तर शेख आणि राघव खर्चे यांनी अनेक रायडर्सना मौलिक सूचना देत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.