जागतिक मत्स्य व्यवसाय दिन----------लोगो
(१८ नोव्हेंबर टुडे ३)
शेती आणि मत्स्यपालन
२१ नोव्हेंबर हा जागतिक मत्स्य व्यवसाय दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस उपजीविकेच्यादृष्टीने शाश्वत मत्स्य व्यवसायाचे महत्त्व मच्छीमार समुदायांना पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. अतिमासेमारी रोखणे, माशांच्या पैदाशीची काळजी घेणे आणि माशांच्या अधिवासाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जाणीवजागृती करणे हा जागतिक मत्स्य व्यवसाय दिनाचा मुख्य हेतू आहे.
- rat२४p९.jpg-
25O06364
- कुणाल अणेराव
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी
सृष्टिज्ञान संस्था
-----
कोकणी माणसाच्या जीवनात, संस्कृतीत आणि आहारात मासे आणि भात या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने होणारा मुसळधार पाऊस भात उत्पादनाला मदत करतो. विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि खाड्यांमधील विपूल मत्स्यसंपदा सहज उपलब्ध होते. शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा देणारी कर्बोदके आणि आरोग्य राखण्यासाठी प्रथिने यांचा उत्तम मेळ या आहाराने साधला जातो. भौगोलिक स्थान, नैसर्गिक उपलब्धता आणि संतुलित पोषणामुळे भात आणि मासे हे खऱ्या अर्थाने कोकणी माणसाचे ‘आद्य खाद्य’ बनले आहे. कोकणात शेतीबरोबरच कोंबडीपालन, शेळीपालन, दूध व्यवसाय असे पूरक व्यवसाय केले जातात. त्याच्यासोबतच भातशेतीमध्ये गोड्या पाण्यातील माशांची पैदास केली तर हा एक उत्तम पूरक व्यवसाय ठरू शकतो. एकात्मिक पद्धतीने शेतीमध्ये ज्याप्रमाणे एकाच वेळी दोन ते तीन पिके घेतली जातात त्याच पद्धतीने भात आणि मासे यांचे एकत्रित उत्पादन घेतले जाते. हा अन्नसुरक्षा आणि उत्पन्न दोन्ही वाढवण्याचा शाश्वत मार्ग आहे. भातशेतीत माशांचे पालन दोन मुख्य पद्धतींनी केली जाते.
*संमिश्र मत्स्यपालन ः यामध्ये भातशेती आणि मत्स्यपालन या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या जातात. शेताच्या बाजूचे बांध २ ते ३ फुटापर्यंत उंच असावेत. तसेच शेताच्या मध्यभागी एक मीटरचा खोल खड्डा करणे आवश्यक आहे. भातकापणी करताना मासे इकडे ठेवता येतात. यात साधारणपणे ९ ते १२ इंच पाणी साठवले जाईल, असे पाहावे. भाताची १२० ते १४० दिवसात वाढणारी आणि पाण्यात चांगली वाढणारी बियाणी वापरावीत आणि लावणी करताना दोन रोपांमध्ये १५ ते २० सेंटीमीटर अंतर ठेवावे. त्यामुळे माशांना पोहण्यासाठी आणि फिरण्यासाठी जागा मिळेल. लावणी झाल्यावर यात गोड्या पाण्यातील Indian Major Carps या कुटुंबातील रोहू, मृगल, कटला, तिलापियासारख्या माशांच्या प्रजाती वाढवता येतात. माशांची वाढ जलद व्हावी यासाठी शेंगदाण्याची पेंड आणि गव्हाचा कोंडा एकत्र मिसळून खाद्य म्हणून द्यावे. भातशेतीत कोणतेही रासायनिक खत, कीटकनाशक अथवा तणनाशक घालू नये. त्यामुळे मासे मरू शकतात. खाचरात जास्त झालेले पाणी काढायचे झाल्यास जाळी लावून काढावे म्हणजे मासे बाहेर जाणार नाहीत.
हे मासे पाण्यातील तण आणि खोडाच्या किडींसारख्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रासायनिक तणनाशके आणि कीटकनाशके घालण्याची गरज पडत नाही. माशांची विष्ठा हे नैसर्गिक खत असल्यामुळे भाताच्या रोपांची वाढ जोमदार होते. यामुळे भाताच्या उत्पादनात मोठी वाढ झालेली दिसून आली आहे. चार ते सहा महिन्यात या माशांचे वजन ५०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत वाढते. प्रथम वजन वाढलेले मासे काढून घेऊन छोटे मासे मध्यभागी केलेल्या खड्ड्यात ठेवावेत. जास्तीचे साठलेले पाणी काढून टाकावे.
शेती कोरडी झाली की, मग भाताची कापणी करावी. त्यात पुन्हा पाणी भरून राहिलेले मासे वाढवू शकतो. बाहेरून पाणी घालताना माशांना हानिकारक जीव जात नाहीत, याची काळजी घ्यावी. हे मासे पुढील महिन्याभरात तयार होतात. ते काढून घेऊन लगेच शेताची मशागत करून घ्यावी. त्यामुळे माशांची विष्ठा आणि भाताचे राहिलेले खुंट हे जमिनीत मिसळून सेंद्रिय खताचे एकत्रीकरण व्हायला मदत होते. माती रब्बीच्या हंगामासाठी तयार होते.
*आवर्तन पद्धत ः यामध्ये खरीप हंगामात भात लागवड केली जाते आणि भातकापणीनंतर ते शेत माशांच्या तळ्यात रूपांतरित केले जाते. या शेतात पीक नसल्याने आणि खोली जास्त असल्याने यात मोठ्या प्रमाणावर मासे पाळू शकतो तसेच एक वर्षापर्यंत वाढणारे मोठे मासे यात घेऊ शकतो. मासे काढून घेतल्यावर शेताची मशागत करून घ्यावी म्हणजे सेंद्रिय खताचे एकत्रीकरण होऊन माती खरीप हंगामासाठी तयार होईल. भातशेतीमध्ये पाळलेले मासे म्हणजे अत्यंत कमी खर्चात पौष्टिक आणि प्रथिनयुक्त अन्नाचे उत्पादन होय शिवाय मासे विकून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.