कामथे रुग्णालयात
नेत्र शस्त्रक्रियेचा प्रारंभ
चिपळूण ः कामथे उपजिल्हा रुग्णालयातील नूतन नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सुनील डोखळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी पहिली नेत्र शस्त्रक्रिया केली. अत्याधुनिक नेत्रसेवा सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम मोठे पाऊल मानला जात आहे. या यशस्वी सुरुवातीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. असितकुमार नरवाडे, इन्चार्ज सिस्टर तसेच रुग्णालयातील सर्व स्टाफ आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लवकरच डॉ. पवन सावंत, डॉ. सुनील डोखळे यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक यंत्रसामुग्री, अत्याधुनिक उपकरणे आणि नवीन नेत्र शल्यचिकित्सकांच्या टीमसह नेत्ररुग्णांसाठी अधिक व्यापक सेवा सुरू करणार आहे.
सुकाई देवी मंदिर
रस्त्याचे भूमीपूजन
चिपळूण ः देवदिवाळीच्या मुहूर्तावर असुर्डे गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुकाई देवी मंदिर रस्ता विकासकामाचे भूमीपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना गैरसोय निर्माण करणारा दोन किलोमीटर लांबीचा दुर्गम रस्ता आता सुरक्षित, सोयीस्कर आणि दर्जेदार रूपात विकसित होणार असल्याची माहिती आमदार निकम यांनी दिली. या कामासाठी त्यांनी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करण्याबाबत त्यांनी ठाम आश्वासन दिले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद गटाध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष सुधीर राजे, पंचायत समिती गणाध्यक्ष नागेश साळवी, उपाध्यक्ष नीलेश खापरे, सरपंच पंकज साळवी, उपसरपंच दिलीप जाधव आदी उपस्थित होते.
‘आठल्ये-सप्रे-पित्रे’त
विमा कार्यशाळा
देवरूख ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरूखच्या उद्योजकता आणि रोजगार विभागामार्फत विम्याची मूलतत्त्वे या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच झाली. या कार्यशाळेत पदवी अभ्यासक्रमातील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी १७ विद्यार्थी जीवनविमा महामंडळ प्रतिनिधी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आणि सर्वांनी यश संपादन केले, हा महाविद्यालयाचा अभिमानाचा क्षण ठरला. या कार्यशाळेसाठी जीवनविमा महामंडळ, रत्नागिरी विभागीय कार्यालयातील विकास अधिकारी प्रसाद आपटे आणि आनंद कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विम्याचे महत्त्व, विमा व्यवसायातील विविध संधी, विमाप्रतिनिधी म्हणून करिअरमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या संधी आणि जीवनविमा महामंडळ परीक्षेची तयारी या सर्व बाबींबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रात्यक्षिक सत्रे, संवादात्मक चर्चा आणि प्रश्नोत्तरांचादेखील भाग ठेवण्यात आला होता.
वडवली विद्यालयाची
विज्ञान प्रतिकृती प्रथम
राजापूर ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने राजापूर हायस्कूल व गोडे-दाते कनिष्ठ महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी विज्ञान सृजन २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी, संकल्पनेचे सखोल विश्लेषण आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर माध्यमिक विद्यालय वडवलीच्या डीएनएची संरचना व कार्य या विज्ञान प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटाकावला. राजापूर हायस्कूल व गोडे-दाते कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी विज्ञान विभागातर्फे ‘विज्ञान सृजन २०२५’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये तालुक्यातील दहा शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत वैज्ञानिक प्रतिकृती व मॉडेलद्वारे नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले. मानवी शरीरातील विविध ग्रंथींचे कार्य दाखवणारे कार्यक्षम मॉडेल या माध्यमिक विद्यालय शिवणेखुर्द प्रशालेच्या प्रतिकृतीने द्वितीय आणि मानवी स्त्री प्रजनन संस्थेची संरचना दाखवणारे मॉडेल या नाटे नगर विद्यामंदिर नाटेच्या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकावला. नूतन विद्यामंदिर ओणी आणि निर्मला भिडे माध्यमिक विद्यालय कोंडये या प्रशाळेच्या प्रतिकृतींनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह प्रकाश भावे, कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी, संस्थेचे खजिनदार अनंत रानडे, सदस्य सतीश रहाटे, रमेश पोकळे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.