06768
राष्ट्रप्रेमाची ज्योत अखंड तेवत राहो
डॉ. मोहन दहिकर ः कुडाळात २६/११ हल्ल्यातील शहिदांना वंदन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः आपण आपले काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडूया. म्हणजे त्यातून आपल्याकडून गैरप्रकार होणार नाहीत व देशामध्ये देश विघातक शक्ती वाढणार नाहीत. त्यासाठी नाक, कान, डोळे उघडे ठेवून सजग होऊन आजूबाजूला पाहा. संशयास्पद गोष्टी सुरक्षा यंत्रणेच्या नजरेस आणा. शिस्त, संयम पाळून श्रद्धेने राष्ट्रहित समोर ठेवून आपले काम करा. हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना व निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. डॉ. दहिकर म्हणाले, ‘आजच्या युवा पिढीच्या मनात धगधगत्या राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याच्या दृष्टीने २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व त्यात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. सर्वांत मोठे लिखित संविधान म्हणून भारतीय संविधानाचा उल्लेख केला जातो. त्याच्या चौकटीत राहून आपण काम केल्यास अनैतिक गोष्टी देशात घडणारच नाहीत व सर्वांना समान न्याय मिळवून देश खऱ्या अर्थाने महासत्ता होईल.’
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर स्तंभ उभारून त्यावर शहीद जवानांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यावेळी अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, ५८ महाराष्ट्र बटालियनचे सी. ओ. कर्नल अजयराज एल, त्यांचे सहकारी सीएचएम प्रदीप पाटील, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर, विजय पालकर, नीलेश जोशी, प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे व प्राचार्य उपस्थित होते. शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
--
‘एनसीसी’तर्फे मान्यवरांना ‘गार्ड ऑफ ऑनर’
कर्नल अजय राज एल म्हणाले, ‘समर्थ भारत, विकसित भारत बनवायचा असेल तर देशाप्रती कर्तव्यनिष्ठेने सेवा करा.’ शिस्तप्रिय व दिमाखदार कार्यक्रमानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने आयोजन केल्याबद्दल संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी अभिनंदन केले. एनसीसी छात्रांतर्फे मान्यवरांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.