मत्स्य दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या
अब्दुल बिजली खान ः अनियमित पावसामुळे २ महिन्यांचा हंगाम हुकला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : पावसाळी मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाला; परंतु नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पाऊस, वादळी वाऱ्याच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंतचा मासेमारी हंगाम वाया गेला आहे. बदललेल्या या वातावरणामुळे मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. मोठ्या आर्थिक संकटात मच्छीमार आहेत. त्यामुळे मत्स्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मत्स्य दुष्काळ जाहीर करून मच्छीमारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांना दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ३८७ मच्छीमार नौका आहेत. यामध्ये १ हजार ९०८ ट्रॉलिंग, ३९० मिनी पर्ससीन, १ हजार ८९ गिलनेटिंग नौका आहेत. या नौकांना १ ऑगस्टपासून पूर्णक्षमतेने मासेमारी करता आली नाही. नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबला. विविध वादळांच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या इशाऱ्यांमुळे नौका बंदरातच उभ्या करून ठेवण्याची वेळ आली. मच्छीमार नौकांना मासळी मिळत नसल्याने नौका बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. मासळी मिळत नसल्याने मासळीची खरेदी-विक्री करणाऱ्या महिलांचेही नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा मिरकरवाडा बंदराला भेट देऊन मच्छीमारांच्या परिस्थितीची पाहणी केली. अशावेळी मच्छीमारांना मदतीचा हात मिळावा यासाठी मत्स्य तज्ज्ञांचा चौकशी अहवाल घेऊन मत्स्य दुष्काळाची मदत जाहीर करा, अशी मागणी अब्दुल बिजली खान यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
खर्चसुद्धा भागत नाही !
नौकांवर काम करणाऱ्या तांडेल, पागी, खलाशांचे आठवड्याचे पगार करावेच लागले. त्याचबरोबर त्यांच्या रोजच्या जेवणावरही खर्च झाला. बदललेल्या वातावरणामुळे समुद्रात जाणाऱ्या नौकांना मासळीही मिळत नाही. त्यामुळे हा खर्चसुद्धा अंगावर पडला आहे, असे खान यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.