rat30p11.jpg-
07551
डॉ. प्रशांत परांजपे
वसा वसुंधरा रक्षणाचा... लोगो
इंट्रो
पर्यावरण आणि निसर्ग हा विषय मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ३६५ दिवस, २४ तास अतिशय निगडित आहे, असे असून देखील त्याची जाणीव-जागृती न झाल्यामुळे आज निसर्ग आणि पर्यावरणाचा ऱ्हास अति वेगाने होऊ लागला आहे. पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांसमवेत त्याच्या पालकांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे. याकरिता दरमहा पालकांनी पर्यावरण विषय समजून घेण्यासाठी शाळेत येणे आणि त्याकरिता शाळेने सभेचे आयोजन करणे अनिवार्य आणि अत्यावश्यक आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली.
-----
पर्यावरण संवर्धन ः विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग
विद्यार्थीदशेतच उत्तम नागरिकाचा पाया बांधला जातो. याच वेळी पर्यावरण संवर्धनाचे बीज रोवले गेले, तर पुढील २५ वर्षांत या पर्यावरण संवर्धनाचा वटवृक्ष झालेला दिसून येईल. मात्र, यासाठी परीक्षार्थी पर्यावरण विषय न ठेवता जीवनातील अविभाज्य घटक म्हणून पर्यावरण विषय शिकवला जावा आणि त्या पद्धतीने त्याच्यावर काम केले जावे, तरच पर्यावरण विषय सार्थकी लागेल असा विश्वास आहे.
आजपर्यंत इयत्ता पहिलीपासून प्राथमिक शाळेमध्ये परिपाठाच्या तासाला निसर्ग, पर्यावरण, दैनंदिन गोष्टी, वृत्तपत्रांतील बातम्या अशा अनेक गोष्टींचे धडे दिले जातात. विद्यार्थ्यांना सभाधीटपणा यावा यासाठी त्यांना समोर उभे करून दोन शब्द बोलण्याची तयारी करून घेतली जाते. असे विविध उपाय सुरू असताना, पर्यावरण अभ्यासाच्या बाबतीत चौकटीबाहेर जाऊन शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. पर्यावरण विषय इयत्ता पहिलीपासून ते अगदी एमपीएससीपर्यंत शिक्षण विषयात समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र, पर्यावरण आणि निसर्ग हा विषय मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ३६५ दिवस, २४ तास अति निगडित आहे आणि असे असून देखील त्याची जाणीव-जागृती न झाल्यामुळे आज निसर्ग आणि पर्यावरणाचा ऱ्हास अति वेगाने होऊ लागला आहे.
विद्यार्थ्यांसमवेतच विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील पर्यावरणाचे धडे देणे आवश्यक आहे. यासाठी महिन्यातून एकदा पालक सभेचे आयोजन करून महिनाभरात विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी दिलेल्या अभ्यासाचे आणि कृतीत्मक प्रात्यक्षिकांचे अवलोकन करून घेणे आणि त्या पद्धतीने पालकांनी आपल्या घरात आपल्या सवयी बदलणे, असा बदल घडवून आणणे अत्यावश्यक आहे.
* हे का करणे गरजेचे आहे?
शिक्षक हे विद्यार्थ्यांना अतिशय प्रामाणिकपणे शाळेतील प्रत्येक विषयाचे ज्ञान देत असतात. पर्यावरण संदर्भातील व्याख्याने, गप्पा, विज्ञान विषयक कार्यक्रम, सरस्वती पूजनाच्या निमित्ताने विविध वक्त्यांची संस्कारक्षम व्याख्याने असे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेत आखले जात असतात. प्रामुख्याने शाळेमध्ये पर्यावरण संवर्धनानिमित्ताने प्लॅस्टिकचा वापर टाळा, चॉकलेट खाऊ नका, चुकून खाल्ले तर रॅपर डस्टबिनमध्ये टाका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपला परिसर हरितमय ठेवा अशा अनेक गोष्टींचे पाठांतर करून घेतले जाते. टिपण्या लिहून घेतल्या जातात. परीक्षेत योग्य असे उत्तर विद्यार्थ्यांकडून लिहिले जाते. शाळेच्या आवारात झाडे लावलेली असतील, तर त्याला पाणी घालण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाते. अशा गोष्टी सुरू असतात, मात्र विद्यार्थी एकदा का शाळेच्या आवारातून बाहेर निघून गेला (शाळा सुटल्यावर घरी पोहोचला) की तो पालकांच्या ताब्यात असतो आणि त्यामुळे शाळेत काय शिकवले आहे आणि आपण काय करतो आहोत, काय वागतो आहोत, याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठीच पालकांना शाळेमध्ये आवर्जून हजेरी लावणे आवश्यक आहे.
एका शाळेमध्ये पर्यावरण संदर्भातील व्याख्यानाला विद्यार्थ्यांच्या समवेत पालकांना देखील बोलावण्यात आले होते. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी कचरा रस्त्याच्या बाजूला टाकणार नाही, नदी-नाल्यात टाकणार नाही अशी शपथ घेतली होती आणि तो कुठे जमा करायचा याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले होते. मात्र, त्याच शाळेतील विद्यार्थी जवळच्या नदीपात्रात शाळेत येताना घरचा कचरा टाकताना दिसून आला. याबाबत त्या विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर, त्याने दिलेल्या उत्तरातून पालकांची चुकीची मानसिकता समोर आली. त्या विद्यार्थ्याला विचारले— पर्यावरण विषयाच्या सभेसाठी तुझ्या घरातले पालक आले होते का0 या प्रश्नाचे उत्तर ''नाही'' असे आले. त्या विद्यार्थ्याच्या घरातील कोणीही पालक त्या पर्यावरण विषयाच्या सभेला हजर नव्हते. पुढील प्रश्न विचारण्यात आला: तू कितव्या इयत्तेत शिकतोस0 त्याने उत्तर दिले: सहाव्या इयत्तेत. तू त्या कार्यक्रमाला उपस्थित होतास का? होतो. मग तरीही नदीत कचरा का टाकलास? यावर तो विद्यार्थी म्हणाला: मी इयत्ता तिसरीत या शाळेत आलो आणि रोज माझे बाबा घरचा कचरा मला पिशवीत बांधून देतात आणि जाताना या नदीत टाकायला सांगतात. तो कचरा मी नदीत टाकतो आणि शाळेत जातो. वरील उत्तर ऐकल्यानंतर आम्ही निःशब्द झालो. त्या सभेला घरातील पालक उपस्थित नव्हते, हा एक मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा - शाळेत विद्यार्थी शिक्षकांचे ऐकतो आणि घरी गेल्यानंतर पालकांचे ऐकतो. या दोन्ही गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. मोठ्यांचे ऐकायचे इतकेच त्या बालकाला माहीत असल्यामुळे शाळेत सांगितलेले तो शाळेच्या आवारात त्या पद्धतीने वागतो आणि बाहेर आपल्या पालकांनी सांगितल्याप्रमाणे तो कृती करत असतो. म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये दर महिन्याला पर्यावरण संदर्भातल्या विषयाकरिता पालकांना विद्यार्थ्यांसमवेत बोलावून एक सभा घेणे अनिवार्य करणे अत्यावश्यक गोष्ट आहे.
* विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन कसे करता येईल?
- विद्यार्थ्यांकडे स्टीलचा डबा आणि स्टीलची पाण्याची बाटली असणे आवश्यक आहे. ही व्यवस्था शैक्षणिक उठावातून किंवा ग्रामपंचायत शैक्षणिक फंडातून देता येईल.
- प्रत्येक विद्यार्थ्याने प्लॅस्टिक कॅरीबॅगचा बालहट्ट टाळावा.
- घरामध्ये कोणीही प्लॅस्टिक कॅरीबॅग आणणार नाही, याकरिता विद्यार्थ्याला प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये घरून येताना एक छोटी कापडी पिशवी असणे आवश्यक आहे.
* यामुळे काय होणार?
असे केल्यामुळे घरातून बाहेर पडताना रोज कापडी पिशवी घेऊनच घराबाहेर पडायचे असते, ही सवय लागेल. शाळेत शिक्षकांनी रोज प्रत्येक विद्यार्थ्याने कापडी पिशवी आणली आहे की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. तसेच, घरातील पालकांपर्यंत "घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा" हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाठवणे आवश्यक आहे. वहीवर तशी नोंद करून पालकांची सही घेऊन येणे आवश्यक आहे.
* वृक्ष वाढदिवस साजरा करणे
शाळेत व घरी प्रत्येक बालकाचा पालक वाढदिवस साजरा करत असतो. शाळेमध्ये प्रत्येक बालकाचा वाढदिवस साजरा केला जावा आणि त्यासोबतच शाळेच्या आवारातील एका झाडाचा वाढदिवसही साजरा करण्यात यावा. हा वाढदिवस १०० टक्के इको फ्रेंडली (पर्यावरणपूरक) असणे आवश्यक आहे. या वाढदिवसाच्या वेळी सर्व प्रकारच्या ''यूज अँड थ्रो'' वस्तूंचा वापर टाळायचा आहे. (उदा. सिल्व्हर कोटिंग पेपर डिश, प्लॅस्टिक चमचे, प्लॅस्टिक आणि कागदी कप, प्लॅस्टिकचे डेकोरेशनचे साहित्य इत्यादी टाळायचे आहे.) वाढदिवसानिमित्त एखादे रोप लावायचे आहे आणि ज्या रोपाचा किंवा झाडाचा वाढदिवस करायचा, त्या झाडाला छान रंगरंगोटी करून सजवायचे आहे. त्याला सेंद्रिय खताचा केक अर्पण करायचा आहे. शाळेत विद्यार्थ्यांना चॉकलेटऐवजी राजगिरा लाडू, चिक्की, शेंगदाणे, चणे अशा खाऊचे वाटप करायचे आहे.
* दत्तक झाड योजना
या अंतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक नवीन लावलेले रोपटे दत्तक द्यायचे आहे. वर्षभर शाळेत येताना पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन येऊन, त्यातल्या एका बाटलीतील पाणी या रोपट्याला घालून त्याची जपणूक करून त्याचे संवर्धन करायला शिकवायचे आहे आणि ते झाड पूर्ण एक वर्ष जो विद्यार्थी जगवेल, त्या विद्यार्थ्याला पर्यावरण विषयात वेगळी श्रेणी द्यायची आहे.
* पालक आणि रोपट्यांची जबाबदारी
पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना एक रोपटे त्या विद्यार्थ्याच्या नावे दान करायला सांगायचे आहे आणि ते रोपटे विद्यार्थ्यांकडून जगवून घ्यायचे आहे. त्यासोबतच शाळेकडून एक रोपटे त्या पालकांना द्यायचे आहे. त्या रोपट्याचे संगोपन करून ते जगवण्याची जबाबदारी पालकांवर द्यायची आहे. त्या रोपट्याला त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या नावाची पाटी लावायची आहे.
* कचरा व्यवस्थापन आणि वर्गीकरण
शाळेमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा याच्या वर्गीकरणाचे प्रात्यक्षिक रोज करायचे आहे. त्यासाठी सुक्या कचऱ्याकरिता तीन स्वतंत्र डस्टबिन आणि ओल्या कचऱ्याकरिता कंपोस्ट युनिट किंवा पॉन्डच्या माध्यमातून ओला कचरा (अर्थात पोषण आहारामध्ये शिल्लक राहणारे किचन वेस्ट किंवा मुलांच्या खाऊच्या डब्यात राहणारे वेस्टेज) यामध्ये टाकून त्याच्यापासून शाळेमध्ये सेंद्रिय खत निर्मिती करायची आहे. असे केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या प्रात्यक्षिकाच्या सवयीमुळे आपापल्या घरी देखील अशा पद्धतीची व्यवस्था पालकांना करण्यासाठी बालहट्ट करण्यासाठी प्रवृत्त करायचे आहे. तसे केल्यामुळे प्रत्येक घरातील ओल्या कचऱ्याचे नियोजन घरच्या घरी होऊ शकणार आहे. सुका कचरा स्वतंत्र ठेवल्यामुळे तो पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यास सोयीचे होणार आहे.
* शाळा हे उत्तम कचरा संकलन केंद्रही होऊ शकते
प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छ केलेला स्वतःच्या घरातील सुका कचरा एका बॅगमधून दर सोमवारी शाळेत आणण्यास सांगितला जावा. त्याचे नियोजनबद्ध संकलन करून तो त्याच दिवशी संबंधित गावातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायती किंवा नगरपालिका) यांच्या ताब्यात देण्यात यावा. जेणेकरून तो कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवणे सहज शक्य होईल. जी शाळा अशा प्रकारे संकलन केंद्र करण्यासाठी इच्छुक असेल, त्या शाळेचा सर्व कचरा ताब्यात घेणे आणि संपूर्ण मार्गदर्शन करण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते.
पर्यावरण विषयी शाळेत दिलेला जो प्रकल्प असेल, तो कोणताही कॉपी-पेस्ट किंवा बाजारातून विकत आणलेल्या वस्तूंपासून बनवलेला नसावा. तर तो विद्यार्थ्यांनी त्यांच्या सृजनशीलतेने आणि त्यांच्या आकलन शक्तीप्रमाणे पर्यावरण आणि इतर वस्तू वापरूनच केलेला असणे आवश्यक आहे. याकडे प्रशालेने कटाक्ष ठेवणे गरजेचे आहे.
शाळास्तरावर जल, जमीन आणि जंगल यांच्या संवर्धनाच्या गोष्टी शिकवल्या जातात. पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांसमवेत त्याच्या पालकांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे. याकरिता दरमहा पालकांनी पर्यावरण विषय समजून घेण्यासाठी शाळेत येणे आणि त्याकरिता शाळेने सभेचे आयोजन करणे अनिवार्य आणि अत्यावश्यक आहे.
(लेखक पर्यावरणाचा शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.