गावच्या मालका .........लोगो
(२ नोव्हेंबर पान ६)
दुश्मनीतही इनामदार इमानदार
भूतकाळ स्मरून वर्तमानात आचरण केले तर भविष्यकाळ आनंदात जातो, असे म्हटले जाते. असेच सुंदर भुतकाळातील पूर्वसुरी आम्हाला लाभले अन् त्यांचे १-२ टक्के अनुसरण केल्याने आमचे जीवन आनंदी झाले. ते कसे याची ही झलक.....!
- अप्पा पाध्ये गोळवलकर,
धामणी, संगमेश्वर
-----
माझे पणजोबा अप्पा! त्या वेळी आम्ही इनामदार होतो अन् अर्थात इमानदारही. उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे भातशेती. अर्थात् गडीमाणसेच आम्हा ईनामदारांची शेती करायचे तर आमच्या शेताचे नाव ‘तरीचे शेत’. शेजारच्या सीतारामबापूंच्या शेताचे नाव गोठण तर भाताची लावणी वगैरे झाली की, साधारण भाद्रपदात भातं पोटरीस (गर्भात) यायची तेव्हा एक दिवस बापू आमच्या घरी यायचे अन् अप्पांना सांगायचे. अप्पा, काल गोठणात जाऊन आलो. हा भलामोठा आवा. ही बघा गंगारामाने वेढ काढल्येय. ती वेढ साधारण फूटभर असायची कारण, गंगारामाने बापूंना खुश करण्यासाठी आव्याची वेढ चौपट वाढवलेली असायची मग अप्पा म्हणणार. वा वा छानच हो...; मात्र दुसऱ्या दिवशी अप्पा आपला गडी झिमा याला आमच्या तरीच्या शेतात पाठवायचे, आव्याची वेढ काढायला. झीमापण तयार माणूस. तो दुसऱ्या दिवशी वेढ काढून आणायचा; मात्र काल बापूंच्या आव्याच्या वेढीपेक्षा चार आंगळे मोठी असायची. मग अप्पा काल बापूंनी जी वेढ काढलेली येठाची वेल असायची ती घेऊन बापूंकडे जाऊन सांगायचे, बापू आज तरीच्या शेतात गेलो होतो. आव्याची वेढ काढली, ही बघा; मात्र जेव्हा भात पिकायचे तेव्हा किती पीक आले याची चर्चा कधीच व्हायची नाही ही गम्मत !!
दुसरे एक वामन भाऊ होते. त्यांची अन् अप्पांची दुश्मनी. एक दिवस काय झाले, भाऊंची गुरे बाजा सुर्व्याच्या नाचणीच्या सर्व्यात गेली नी सारी नाचणी खाऊन टाकली. त्याचा राग येऊन बाजाने भाऊंच्या जांगळ्याला थोबडवला, हे अप्पांना कळले; मात्र, अप्पा लगेचच भाऊंच्या घरी गेले आणि अंगणातून ओरडले अरे *** च्या भाऊ तुझ्या जांगळ्याला बाज्याने मारलेय चल बाहेर पड. बाज्याचा न्याय करायला भाऊही लगोलग अप्पांबरोबर निघाले. वाटेत मोठा पऱ्या होता, त्याला पूर आलेला. उतारमोड पाणी आलेले तरीही त्या पुरात उड्या टाकून पलीकडे जाऊन दोघांनीही बाज्याला सोलपटवला. जवळजवळ अर्धमेला होईस्तोवर मारून झाल्यावर त्याला सांगितले की, तुझे नुकसान झाले होते, तर मला सांगायचे होते. मी भरून दिले असते; पण तू कायदा हातात घेऊन विठ्याला मारलास म्हणून तुला ही शिक्षा. तुझी नाचणी किती झाली असती? तर बाज्या म्हणाला, खोतानू धा मन तरी झाली असती अंदू. लगेच भाऊनी सांगितले, ठीकाय उद्या माणसं घेऊन ये नी पंधरा मण नाचणी घेऊन जा; पण पुन्हा असली आगळीक केलीस तर याद राख.
भाऊंचा नी अप्पांचा जमिनीचा कज्जा रत्नांग्रीच्या कोर्टात सुरू होता. ज्या दिवशी तारीख असेल त्याच्या आदल्या दिवशी भाऊ अप्पांच्या आंगण्यात यायचे नी सांगायचे, अप्पा उद्या पहाटे कोर्टात जायची आठवण आहे ना? मग तू पांच-सहा भाकऱ्या घे. भाजी मी घेतो. रत्नागिरीत कोर्टात एकत्र जेवत. संध्याकाळी घरी येत अन् दुसऱ्या दिवसापासून एकमेकांचे तोंडही पाहात नसत. अशी निकोप दुष्मनी होती त्यांची. असे असले तरी सार्वजनिक कामात दोघेही एकविचाराने, एकदिलाने कामे करत अशी आदर्श दुश्मनी होती त्यांची.
(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.