काही सुखद---लोगो
rat2p39.jpg-
08024
भावेश पाले
---------
पत्र्याच्या झोपडीतून सीएपर्यंतचा प्रवास
भावेश पालेची प्रेरणादायी यशोगाथा : तुरळमधील पहिला सीए
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २ः प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की, आपले मूल उच्चशिक्षित व्हावे, कुटुंबाचा आधार बनावे आणि समाजासाठी आदर्श ठरावे, अशीच प्रेरणादायी कथा आहे. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-हरेकरवाडी येथील भावेश पाले यांची. गावातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट (सीए) बनण्याचा मान मिळवणाऱ्या या तरुणाचे आयुष्य म्हणजे संघर्ष, स्वप्न, कष्ट आणि जिद्दीची विलक्षण सांगड आहे.
भावेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती. स्वतःची जमीन केवळ दोन हाताची, गावात कुठल्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही, शासकीय किंवा साधी खासगी नोकरी नाही. दिवसभर काम केले तरच चूल पेटण्याची वेळ. आई दीपाली आणि वडील दीपक पाले यांचे शिक्षण कमी, कुटुंबात पाच सदस्य, बहीण भाविका अभ्यासात हुशार; परंतु परिस्थितीमुळे तीही आपल्यापरीने कुटुंबासाठी हातभार लावत असे. गावात उत्पन्नाचे कोणतेही स्थिर साधन न मिळाल्याने पाले कुटुंब थेट मुंबईत दाखल झाले. राहायचे कोठे? हा मोठा प्रश्न; अखेर घाटकोपरमधील एका पत्र्याच्या झोपडीत, गोडाऊनसदृश खोलीत त्यांनी संसार थाटला. आईला चपाती लाटण्याचे काम, वडिलांना गरजेनुसार हॉटेलमध्ये वेटरचे काम नंतर मंडपबांधणीचे काम असे कामधंदे करत ते संसार चालवत राहिले. सुट्टीच्या दिवशी वडील हातगाडी ओढून कुटुंबाचा गाडा ओढत.
भावेश लहानपणापासूनच अभ्यासू होता. आई ज्या घरात काम करत होती त्या मालकांनी पहिलीच्या फी ची मदत केली. पुढे भावेशने विश्वासास पात्र ठरवत एकेक इयत्ता उत्तीर्ण करत दहावीत ८० टक्के गुण मिळवले. मामा दत्ताराम धनावडे आणि काहींनी पुढाकार घेत त्याला अकरावी-बारावीचे शिक्षण सोमय्या कॉलेजमध्ये करून दिले. बारावीला त्याने ७९ टक्के गुण प्राप्त केले. कॉमर्स पूर्ण केल्यानंतर भावेशने सीएचा अतिशय कठीण अभ्यासक्रम हाती घेतला. पहिल्याच प्रयत्नात सीएची पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील चार वर्षे चिकाटीने, अपार मेहनतीने अभ्यास करत अखेर भावेशने सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ही कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
चौकट
मध्यरात्री दोननंतर करायचा अभ्यास
घरासमोर सतत वाहतुकीचा गोंगाट, आजुबाजूला कायम दंगा, आवाजाची दाहकता, अभ्यासाचा अभाव असलेली जागा हे सगळं असूनही भावेश यशासाठी झटत राहिला. अशावेळी रात्री दोन वाजता शांतता पसरल्यावर भावेश अभ्यासाला बसायचा. रात्रभर अभ्यास आणि दिवसभर काम, असा त्याचा दिनक्रम वर्षानुवर्षे सुरू राहिला. भावेश पाले हा हरेकरवाडी गावातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट ठरला आहे. त्याच्या या यशामागे आई-वडिलांचे अथक कष्ट, त्याग, मामाच्या आणि पोलिसपाटील संजय ओकटे यांच्या पाठिंब्याने कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.