चिपळुणात नव्या समीकरणाची सुरुवात
पक्षांच्या वाटचाली स्पष्ट ; राऊत समर्थकांना भासली प्रचारकाची उणीव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह घेऊन तसेच अपक्ष म्हणून रिंगणात असलेले सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते; मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना सर्व जागांवर अर्ज भरायला सांगणारे माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूणकडे पाठ फिरवली. त्यामुळे राऊत समर्थक ठाकरे सेनेच्या उमेदवारांना प्रचारासाठी स्टार प्रचारकाची उणीव भासली शिवाय सेनेच्या अनेक उमेदवारांना आमदार भास्कर जाधव यांच्याशी वैर घ्यावे लागले. या निवडणुकीत अनेक समीकरणे जुळून आली आहेत. विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांची वाटचालही स्पष्ट झाली आहे.
चिपळूण पालिकेत कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून येतील यापेक्षा नगराध्यक्ष कोण होईल, याची चर्चा सर्वाधिक आहे. शरद पवार गटाचे रमेश कदम आणि युतीचे उमेदवार उमेश सकपाळ यांच्यात थेट लढत झाली. मतदान संपल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचा उमेदवार आणि अपक्ष उमेदवार किती मते घेणार, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. या निवडणुकीत महायुती होणार, असे पालकमंत्री अखेरपर्यंत सांगत होते; मात्र शेवटच्या क्षणापर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वास घेण्यात आले नाही. आमदार शेखर निकम यांचे चिपळूण शहराच्या विकासात योगदान मोठे असताना त्यांना डावलण्यामागचे खरे कारण काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे. शेखर निकम समर्थक मिलिंद कापडी यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली; परंतु महायुतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुणाला मतदान केले, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. चिपळूणमध्ये काँग्रेसचे एकनिष्ठ लियाकत शाह यांनी सुरुवातीपासून नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्याचे जाहीर केले होते. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तरीदेखील ते अपक्ष म्हणून रिंगणात राहिले. त्यांच्यासह इतर उमेदवारांनी कोणाची मते कमी केली, याची चर्चा आता सुरू झाली आहे. आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यातील मैत्रीला अधिक बळ देणारी ही निवडणूक ठरली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी अंतिम टप्प्यात नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर अर्ज भरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर तयारी नसलेल्या कार्यकर्त्यांनीही राऊतांच्या जीवावर अर्ज दाखल केले; मात्र भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केल्यानंतर राऊत चिपळूणकडे फिरकलेच नाहीत. जाधवांच्या नाराजीची चर्चा मातोश्रीपर्यंत पोचल्यानंतर राऊत चिपळुणात आले; परंतु जाधवांना न भेटता केवळ गोवळकोट येथे आढावा बैठक घेऊन निघून गेले. राऊत यांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज दाखल केलेले किती उमेदवार निवडून येतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.
---
चौकट
जाधव-कदम मेतकूट जमले
चिपळूण पालिका निवडणुकीत रमेश कदम आणि भास्कर जाधव खरच एकत्र येतील की, नाही याबाबत अनेकांना शंका होत्या; परंतु कदमांसाठी भास्कर जाधवांनी कॉर्नर सभा घेतल्या. दोघांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून दोघांनी ठरवलेल्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम केले. भास्कर जाधव यांची लेक कांचन शिंदे निवडणुकीच्या मैदानात होत्या. आमदार जाधव यांच्याबद्दल एका विशिष्ट समाजात गैरसमज आहे; मात्र रमेश कदमांकडून भास्कर जाधवांच्या लेकीचा प्रचार करताना वडिलांची शिक्षा मुलीला का देता, असे म्हणत रमेश कदमांनी अनेकांच्या काळजाला हात घातला. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सुरुवातीला रमेश कदम यांच्या प्रचारात सक्रिय नव्हते. त्यांच्याशी भास्कर जाधवांनी स्वतः संपर्क करून त्यांना कदमांचा प्रचार करायला लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.