रब्बीच्या २ हजार ६२७ हेक्टर पेरण्या पूर्ण
पंधरा दिवस विलंब ; राजापूर तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र, पावटा, कुळीथ, मक्यास प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ः डिसेंबर महिना उजाडला तरीही रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ऊस पीक वगळून २ हजार ६२७.६६ हेक्टर क्षेत्रावर तर ऊसपिकासह २ हजार ६४४.६६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ५ हजार ४०५ हेक्टरवर पेरण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत कुळीथ, संकरित पावटा, मका, कडधान्य, ऊस कडधान्यासह विविध पिकांची ५० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्याला उशीर झाला. त्यानंतर पावसाळ्यात पावसाने दमदार बॅटिंग केल्यामुळे जिल्हात भातपिके बहरली होती. पावसाळा हंगाम संपल्यानंतर ही ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी, अतिवृष्टी झाल्यामुळे भातपिके वाहून गेली, खराब झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक मातीमोल झाले. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर यंदा रब्बीच्या पेरणीला विलंब झाला. अवकाळी पावसामुळे खरीप पिकांची काढणी, झोडणीला विलंब झाला. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने रब्बीच्या पेरण्यास सुरुवात झाली. कोकणातील शेतकऱ्यांनी नांगरणी करून कडधान्यासह पालेभाज्यांची पेरणी पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत २ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण असूनसुद्धा पेरण्या संथगतीनेच सुरू आहेत. डिसेंबरच्या महिनाभरात रब्बीच्या पेरण्या पूर्ण होतील, असेही कृषी विभागाच्यावतीने कळवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीस आता वेग आला आहे. जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात सर्वाधिक ७२०.२५, रत्नागिरी ५९३ हेक्टर, संगमेश्वरात ४२५ हेक्टर पेरण्या झाल्या आहेत तर सर्वात कमी मंडणगड येथे ८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा पाच हजाराहून अधिक रब्बी हंगामाचे उद्दिष्ट आहे.
---
चौकट
- तालुकानिहाय पेरण्या क्षेत्र
तालुका* क्षेत्र (हेक्टर)
चिपळूण* ६८.४१
दापोली* १०५
खेड* २४१
गुहागर* १४८
मंडणगड* ८५
रत्नागिरी* ५९३
संगमेश्वर* ४२५
राजापूर* ७२०.२५
लांजा* २४२
---
कोट
यंदा रब्बी हंगाम उशिराने सुरू झाला. त्यामुळे पेरण्यांचा वेग कमी दिसतो. यंदा ५ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल.
- सदाशिव सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी