-rat४p१३.jpg-
२५O०८४०५
रत्नागिरी ः चंपक मैदान येथील झाडावर बसलेले अमूर ससाणा.
(छाया ः अॅड. प्रसाद गोखले)
--------
हजारो मैलांचा प्रवास करत ‘अमूर ससाणा’ रत्नागिरीत
पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ; चंपक मैदानासह आदिष्टीजवळ आढळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः लांब पल्ल्याचे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या अमूर ससाणा (Amur Falcon)या देखण्या पक्ष्याचे आगमन सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाले आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत हा स्थलांतरित शिकारी पक्षी आढळत असल्याचे पक्षीमित्र प्रसाद गोखले यांनी सांगितले. रत्नागिरीतील निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अमूर ससाणा हा मुख्यत्वे सायबेरिया आणि चीन या भागांमध्ये आपला विणीचा हंगाम घालवतो. मात्र, थंडी सुरू होताच हे पक्षी सुमारे २२ हजार किलोमीटरच्या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात करतात. ऑक्टोबर महिन्यात त्यांचा मोठा थवा भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये, विशेषतः नागालँड आणि मणिपूरमध्ये दाखल होतो. तिथे वाळवीसारखे कीटक फस्त केल्यानंतर, त्यांचा पुढचा प्रवास पश्चिम किनारपट्टीकडे सुरू होतो. पश्चिम किनारपट्टीवरून मार्गक्रमण करताना, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांदरम्यान अमूर ससाणा रत्नागिरीच्या भूभागावर विश्रांतीसाठी आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ऊर्जा मिळवण्यासाठी थांबतो. येथील नैसर्गिक अधिवास आणि विपुल कीटक यांची उपलब्धता त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरते. रत्नागिरीतील चंपक मैदानाजवळचा भाग तसेच शिरगाव आदिष्टी मंदिर परिसर यांसारख्या ठिकाणी नुकत्याच त्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक पक्षी निरीक्षकांना हा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी मिळाली आहे.
अमूर ससाणा हा अरबी समुद्र ओलांडून आफ्रिका खंडाकडे आपला प्रवास पूर्ण करतो. सायबेरिया, चीन, नागालँड, रत्नागिरी आणि आफ्रिका असा त्यांचा प्रवास चक्रावून टाकणारा असतो. एवढ्या दूरचा प्रवास करून आलेल्या या पक्षाचे दर्शन रत्नागिरीकरांसाठी एक ‘पर्वणी’ ठरत आहे. स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या नोंदी व्यवस्थित घेण्यासाठी रत्नागिरीतील विविध अधिवासांना भेट देणे आणि त्याबद्दलची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. अमूर ससाणासारख्या महत्त्वाच्या पक्षाचे आगमन हे सिद्ध करते की, रत्नागिरीचा भूभाग केवळ स्थानिक पक्षांसाठीच नव्हे, तर जागतिक स्थलांतर मार्गावरील पक्षांसाठी देखील एक महत्त्वाचा ‘हॉल्टिंग पॉईंट’ आहे. पक्षी निरीक्षकांनी अधिक जागरूक होऊन, या स्थलांतरित पाहुण्यांच्या नोंदी घेऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी हातभार लावणे ही काळाची गरज आहे, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
--------
कोट
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अनेक महत्त्वपूर्ण आणि संकटग्रस्त पक्षांची नोंद केली आहे. या नोंदी स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करतात. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात, जिथे कातळसडे, नद्यांचे किनारे आणि दाट जंगल अशा विविध प्रकारच्या अधिवासांची रेलचेल आहे, तिथे पक्षी निरीक्षकांनी सक्रिय होणे अत्यंत गरजेचे आहे.
- ॲड. प्रसाद गोखले, पक्षी निरीक्षक रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.