प्रशिक्षणातून यशस्वी उद्योजक बनतील
डॉ. केतन चौधरी ः गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीवर शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः गोवा राज्य आणि कोकण कृषी विद्यापीठाचे एकसंघ असे संबंध आहेत. त्यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती या प्रशिक्षणाला गोवा राज्यातील शेतकरी प्रशिक्षणार्थींची उपस्थिती चांगली आहे. या प्रशिक्षणामुळे यशस्वी उद्योजक तयार होणार आहेत, असे प्रतिपादन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती या विषयावरील दोनदिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. २ ते ३ डिसेंबर या कालावधीत हे शिबिर रत्नागिरीत झाले. याचे उद्घाटन कृषी विज्ञानकेंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अंनत हनुमंते यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणार्थींनी गटशेती करून आपल्या उद्योगाला कसा फायदा होईल, याबद्दल विचार करावा. आपली यशोगाथा हीच या प्रशिक्षणाचे फलित असेल, असे डॉ. हनुमंते यांनी सांगितले. या प्रसंगी गोवा येथील कृषी अधिकारी पूजा महालकर, प्रा. सचिन साटम, वर्षा सदावर्ते उपस्थित होते.
गोड्या पाण्यातील मत्स्यशेती सद्यःस्थिती व भविष्य तसेच मत्स्यशेती प्रकल्प अहवाल या विषयी डॉ. केतन चौधरी यांनी तर माशांचे रोग व व्यवस्थापनाविषयी डॉ. आसिफ पागरकर यांनी मार्गदर्शन केले. मत्स्यशेती पूर्वतयारी तसेच माशांची वाढ व नोंदी या विषयी नरेंद्र चोगले आणि माशांची बीज ओळख, वाहतूक व संगोपन या विषयी डॉ. वैभव येवले यांनी उपस्थितांना माहिती दिली.