कुपोषणमुक्त जिल्ह्याचे स्वप्न अद्यापही दूरच
५८९ मुले कुपोषित; दहा वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश कधी?
नंदकुमार आयरे ः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ः सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू असले तरी आजही जिल्ह्यात ५५७ कुपोषित तर ३२ तीव्र कुपोषित मिळून ५८९ बालके या यादीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा अद्यापही कुपोषणमुक्तीपासून दूरच राहिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून गेली दहा वर्षे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी व त्यांना कुपोषणापासून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात २३ ठिकाणी बाल संगोपन व उपचार केंद्र सुरू केली आहेत. त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असताना जिल्हा कुपोषणमुक्तीपासून अद्यापही दूर असला तरी कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश येताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये जिल्ह्यात ७६८ कुपोषित तर ६७ तीव्र कुपोषित बालके होती; मात्र गेल्या तीन वर्षांच्या प्रयत्नात अनेक बालकांना बाल संगोपन व उपचार केंद्राच्या माध्यमातून कुपोषणातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ० ते ६ वयोगटातील वजन घेतलेल्या एकूण २३ हजार १२५ बालकांमध्ये २२ हजार ५३७ एवढी बालके सर्वसाधारण वजनाची आहेत, तर ५५७ कुपोषित व ३२ तीव्र कुपोषित बालके असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुपोषित बालकांच्या पालकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करतानाच कुपोषित बालकांना ‘व्हीसीडीसी’ केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. सद्यस्थितीत सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके देवगड तालुक्यात असून या तालुक्यात ८, सावंतवाडी ६, कणकवली ६, मालवण २, वेंगुर्ले १, कुडाळ ४, वैभववाडी ५ तर दोडामार्गमध्ये एकही तीव्र कुपोषित बालक नाही.
.......................
कोट
सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करणे हे जिल्ह्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुलांच्या कुपोषणामागची कारणे शोधून कुपोषित मुलांवर उपचार व अतिरिक्त आहार दिला जात आहे; मात्र काही मुलांमध्ये दुर्धर आजार असल्याने त्यांच्या वजनात वाढ होण्याची प्रक्रिया फारच कमी दिसून येते.
- मनोज पाटणकर, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी, सिंधुदुर्ग
---
(ग्राफ करा)
तालुकानिहाय कुपोषित बालके
सावंतवाडी १०३
कणकवली १०२
मालवण ४२
वेंगुर्ले ३९
कुडाळ १२५
वैभववाडी २२
देवगड ९८
दोडामार्ग २६