रत्नागिरीत ‘वही–पेन शैक्षणिक साहित्य’ अभियान
आज महापरिनिर्वाण दिन ; सावित्रीबाई संस्थेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था ‘वही–पेन शैक्षणिक साहित्य अभियान’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी राबवण्यात येत आहे. महापुरुषांच्या आदर्शांकडून प्रेरित होत समाजातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा अभियानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे ६ डिसेंबर रोजी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने येऊन अभिवादन करतात. फुले, हार, अर्पण करतात, मेणबत्त्या प्रज्वलित करतात, त्यांच्या भावना व्यक्त करतात. यापेक्षा समाजहिताचा विचार करून ‘वही–पेन’ या उपयुक्त साहित्याच्या माध्यमातून अभिवादन करण्याचे आवाहन संस्थेने यावर्षीही केले आहे.
डॉ. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षणाचा मूलमंत्र समाजाला दिला. त्याच शिक्षणपरंपरेचा वारसा जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी थोडेसे योगदान देण्याची संधी या अभियानातून निर्माण होत आहे. आज सायंकाळपासून हा उपक्रम सुरू झाला. तो शनिवारी (ता. ६) सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जमा झालेले शैक्षणिक साहित्य संस्थेच्या माध्यमातून ओळखल्या गेलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
संस्थेचे कार्यालय पाली येथील कॉमन मॅन ऑनलाईन सर्व्हिस सेंटर येथे आहे. नागरिकांनी समाजाप्रति कृतज्ञता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन म्हणून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. या अभियानासंबंधी मदत, साहित्य जमा करण्यासाठी किंवा इतर माहितीकरिता इच्छुकांनी चंद्रमणी सावंत, अमर पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---------
कोट
मागील वर्षी झालेल्या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या सहभागामुळे शेकडो विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि अन्य साहित्य उपलब्ध झाले. यंदाही हा उपक्रम अधिक व्यापक होईल.
--चंद्रमणी सावंत, सावित्रीबाई फुले संस्था.