मोरवणेत आरोग्य उपकेंद्र मंजूर
४५ लाखांचा निधी ; कामाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः तालुक्यातील मोरवणे येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे. यासाठी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला असून,
या इमारत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम उपस्थित होत्या. मोरवणे येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. आमदार शेखर निकम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडे या भागातील ग्रामस्थांनी मागणी केली होती. अनेक महिन्याच्या पाठपुराव्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. इमारत बांधण्यासाठी ४५ लाखांचा निधीही शासनाकडून मंजूर झाला आहे. ही इमारत बांधण्यासाठी जागेची गरज होती. गावातील रहिवासी सत्यविजय शिंदे यांनी आरोग्य उपकेंद्रासाठी जागा दिल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव यांनी त्यांचे आभार मानले. गावच्या सरपंच संचिता जाधव म्हणाल्या, आता गावात आरोग्य उपकेंद्र होणार असल्यामुळे आमची वैद्यकीय गैरसोय दूर होणार आहे. गावातील नागरिकांना प्राथमिक आजारांवर उपचार करण्यासाठी चिपळूणला जावे लागत होते. यापुढे गावातच उपचार होणार असल्यामुळे पायपीट थांबणार आहे. उपसरपंच सुनील सावर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी मोरे, सृष्टी शिंदे, प्रभाकर धाडवे, प्रिया अदावडे, संजय म्हापाले आदी या वेळी उपस्थित होते.