-rat५p१५.jpg-
२५O०८६२६
रत्नागिरी : विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना विजयानंद निवेंडकर. सोबत फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर, शिल्परेखा जोशी आदी.
------
विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना विज्ञान प्रदर्शनातून उर्जा
विजयानंद निवेडंकर ः फाटक हायस्कूलमध्ये आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : शालेय विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या नवीन कल्पनांना संधी देणारे असून, विद्यार्थ्यांना पडलेल्या ''का?'' या प्रश्नामधून नवीन विचारांची आणि संकल्पनांची निर्मिती होते. त्यामधूनच नवनवीन शोध लागतात आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो, असे प्रतिपादन कुर्धे येथील पटवर्धन विद्यामंदिराचे मुख्याध्यापक विजयानंद निवेडंकर यांनी फाटक हायस्कूलच्या शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच झाले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विज्ञान शिक्षक मारुती खरटमोल यांनी करून दिला. नवीन संशोधनाचा वापर विद्यार्थ्यांनी देशाच्या हितासाठी करावा, असे मुख्याध्यापक राजन कीर यांनी सांगितले. विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी फायर सेफ्टी, वेस्ट मॅनेजमेंट, ऑटोमॅटिक स्ट्रीटलाईट, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, ग्रासकटर, मानवी पचनसंस्था, गणितीय मॉडेल्स अशा विविध विषयांवर १३० प्रतिकृती मांडल्या होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या तयारीचा भाग म्हणून या विज्ञान प्रदर्शनाकडे पाहिले जाते.
---
चौकट
प्रदर्शनातील विजेते
पाचवी-सहावीच्या गटात पारस लिंगायत, श्लोक सागवेकर यांच्या ग्रासकटर, आदित्य गोठणकर, तन्मय धावडे यांच्या रेनसेन्सर तर देवश्री धुमक, कार्तिकी चव्हाण यांच्या जलचक्र या उपकरणांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. सातवी-आठवीच्या गटात सारा महाजन, मुक्ता बापट यांच्या हवा शुद्धीकरण, सोनाली सरदेसाई हिच्या सौरपंप, अर्णव पटवर्धन, अर्णव जोगळेकर यांच्या भूकंपशोधक प्रकल्पाला अनुक्रमे बक्षीस मिळाले. नववी ते बारावीच्या गटात यश भिडे, मानस आग्रे यांच्या विघटनशील प्लास्टिक, बिल्वा रानडे, सोनम शेट्ये यांच्या टाकाऊतून ऊर्जानिर्मिती तर अन्वय बोरकर, चिराग धुमाळ यांच्या वायरलेस पॉवर ट्रान्सफॉर्मर या प्रतिकृतींनी यश मिळवले.