08723
आंब्याच्या झाडावरून पडून
आचरा भंडारवाडीत तरुण ठार
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ५ ः आचरा भंडारवाडी येथील करारावर घेतलेल्या आंबा कलमावर फवारणी करताना सुमारे ३० फुटांवरून कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज (वय ४५, रा. मालवण भरड) असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबतची खबर त्याचा भाऊ लुईस फ्रान्सिस कार्डोज (वय ४२) यांनी आचरा पोलिस ठाण्यात दिली. आचरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रकरणाची नोंद केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लुईस कार्डोज हे दहा वर्षांपासून आंबा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. आचरा-भंडारवाडी येथील आंबा कलम त्यांनी कराराने घेतले होते. ते आज आचरा येथे पत्नी, भाऊ व कामगार यांच्यासह झाडावर फवारणीसाठी आले होते. त्यांचे भाऊ अँड्र्यू हे फवारणी करण्यासाठी उंच असलेल्या आंबा कलमावर चढले होते. कलमावरील फवारणी करून पूर्ण झाली होती. फवारणी पूर्ण झाल्याने डेरेदार कलमावरून ते दोरीच्या साहाय्याने खाली उतरत होते; मात्र हातातील दोरी सुटल्याने ते सुमारे तीस फुटांवरून झाडाखाली असलेल्या दगडात कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच गतप्राण झाले. आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर, मनोज पुजारे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस हेडकॉन्स्टेबल दिगंबर घाडीगावकर अधिक तपास करत आहेत.