तरुणाईची लोककलेकडे वाटचाल
राज्यभरात कार्यक्रम ; शहरी भागातूनही मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ८ ः सोशल मीडियाच्या दुनियेत अधिक रमलेली तरुण पिढी लोककलेपासून दूर गेली आहे, असे बोलले जात होते; मात्र, सध्याचे चित्र याला छेद देणारे आहे. लोककलेचे सादरीकरण, अभ्यास आणि जतन यामध्ये आजची तरुणाईही अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभर ठिकठिकाणी तरुण कलावंतांचे लोककलेचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात असून, या कार्यक्रमांना केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागातूनही मोठी मागणी वाढत आहे.
कोकण, पुणे, मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये लोककलेच्या कार्यक्रमांची संख्या लक्षणीय वाढली असून, अनेक कार्यक्रम हाऊसफुल्ल होत आहेत. विशेष म्हणजे तरुण लोककलावंतांनी सादर केलेल्या लोककलांची रील्स सध्या इन्स्टाग्राम व फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. शाहिरी, नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, भारूड, पोवाडे, जागरण-गोंधळ, महाराष्ट्राची लोकधारा, कोकणचे खेळे अशा विविध लोककला पूर्वी यात्रा-जत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सादर व्हायच्या. ज्येष्ठ कलावंतांनी या अस्सल लोककलेची परंपरा जपली आणि वाढवली; मात्र, काही काळानंतर ही लोककला लोप पावत चालली असल्याची भावना व्यक्त केली जात होती. आता मात्र लोककलेच्या क्षेत्रात तरुण कलावंतांची संख्या वाढत असून, फोक आख्यान, फोकलोक, लोकगीते आणि लोकवाद्यांवर आधारित कार्यक्रमांनी मराठी रसिकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली आहे. लोकगीतांचे गायन आणि लोकवाद्यांचे वादन यामधून लोककलेचा इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवली जात आहे. कार्यक्रमांमध्ये तरुण कलावंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि मोठ्या ऊर्जेने सादरीकरण करत असून, २० ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी या लोककला चळवळीत सक्रिय झाले आहेत. महाविद्यालयीन तरुणाईपासून आयटी क्षेत्रातील नोकरदार, डॉक्टर, वकील, शिक्षक, बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी अशा विविध क्षेत्रांतील तरुण लोककलेचे कार्यक्रम सादर करत आहेत. -----
कोट
मी गेल्या काही वर्षांपासून लोककलेचे कार्यक्रम करत आहे. गण, गवळण, बतावणी, भारूड, भजन यांसह लोप पावत चाललेली पिंगळा ही लोककलाही सादर करतो. लोककलेचा वारसा जपण्याचे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सादरीकरणातून सुरू आहे.
- जितेंद्र महाडीक, शाहीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.