‘कलाथाई सिलंबन’मध्ये
अर्णव देवरूखकरला सुवर्ण
चिपळूण ः तामिळनाडू येथे झालेल्या नॅशनल कलाथाई सिलंबन (मैदानी खेळ) स्पर्धेत जालगाव (ता. दापोली) येथील अर्णव देवरूखकर याने सुरूल आणि स्टीकफाईट या प्रकारात चमकदार कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळवले. सातत्याने दमदार सराव केल्याने या स्पर्धेत त्याने आपल्या खेळातील कौशल्य दाखवून दिले. या यशात आई-वडील, आजी यांच्यासह वेस्टर्न पॅलेस्टा अॅकॅडमी संस्थेचे संचालक अक्षय भूजबळ, प्रशिक्षक अविराज धामणसकर यांचा मोलाचा वाटा आहे. जानेवारीत गोवा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अर्णवची निवड झाली आहे.
ज्येष्ठांसाठी एकपात्री
द्विपात्री अभिनय स्पर्धा
चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन ४ जानेवारीला करण्यात आले आहे. साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. एकपात्री अभिनयासाठी ४ ते ६ मिनिटे तर द्विपात्री अभिनयासाठी ५ ते ७ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विजेत्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. चिपळूण शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.
सहावी प्रवेशासाठी
नवोदयची १३ ला परीक्षा
पावस ः सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० वा. उपस्थित राहावे. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य बसवराज यांनी कळवले आहे.
डाकघर कार्यालयातर्फे
१८ ला पेन्शन अदालत
पावस ः रत्नागिरी येथील अधीक्षक डाकघर कार्यालयातर्फे १८ डिसेंबरला सकाळी ११ वा. विभागीय डाक कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज ए. डी. सरंगले, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे १५ डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रारअर्ज करावा. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचे तीन महिन्यांच्या आत निराकरण झालेले नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.