‘ती’ मूर्ती ट्रस्टच्या ताब्यात द्या
कणकवली न्यायालय : जानवली येथील मंदिर
कणकवली, ता. ९ : जानवली कृष्णनगरी (ता.कणकवली) येथील दत्त मंदिरातील मूर्ती ही ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, असा निर्णय कणकवली न्यायालयाने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी ही मूर्ती चोरीस गेली होती. त्यानंतर पुन्हा त्या परिसरात ही मूर्ती आढळून आली होती.
ही मूर्ती जमिनीखाली आढळली असल्याचा दावा केल्याने ती पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात दिली होती. याबाबत न्यायालयीन खटला सुरू होता. यात चोरीच्या घटनेत हस्तगत झालेली श्री दत्ताची मूर्ती ही मंदिराच्या स्वयंभू दत्त मंदिर ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, असा महत्वपूर्ण निर्णय कणकवली न्यायालयाने दिला आहे. जमिनीतील खोदाईदरम्यान मिळालेल्या या मूर्तीवर शासनाचा अधिकार असल्याने ती मूर्ती शासनाच्या ताब्यात द्यावी, असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक यांच्यावतीने कणकवली न्यायालयात केला होता. मात्र, ही मूर्ती ट्रस्टच्या मंदिरातून चोरीस गेल्याने ती मूर्ती पुन्हा ट्रस्टच्याच ताब्यात द्यावी, असा निर्णय दिला आहे. ट्रस्टतर्फे देवगड येथील ॲड. सिद्धेश माणगांवकर आणि ॲड. श्रुती माणगांवकर यांनी काम पाहिले.
दरम्यान, या मूर्तीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक यांच्यावतीने कणकवली न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. ही मूर्ती फिर्यादी मोहिते अथवा मंदिर ट्रस्ट यांना पुन्हा देऊ नये. ही मूर्ती जमीन खोदकामादरम्यान मिळाल्याने त्या मूर्तीवर शासनाचा अधिकार आहे. मूर्तीवर मोहिते अथवा ट्रस्टचा अधिकार नाही, असा दावा केला होता. फिर्यादीतर्फे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक यांच्यावतीने केलेल्या या दोन्ही अर्जावर संयुक्त सुनावणी करताना कणकवली न्यायालयाने सदर मूर्ती मोहिते यांच्या ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, असा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.