व्यक्तीविशेष----------लोगो
इंट्रो
जुन्या पिढीला मध्यमवर्गीय घरातले संस्कार, कुटुंबवत्सलता, समरसता ही परंपरेने झिरपत यायची. असेच संस्कार सुधाकर चितळे यांच्यावरही झाले होते. आर्य चाणक्याने म्हटलंय, निःस्पृहाला जग हे तृणवत असते, असा निःस्पृहतेचा आदर्श म्हणजे सुधाकरराव होय...!
- प्रकाश देशपांडे, चिपळूण
--------
अध्यात्म जगलेला माणूस
एक दिवस बँक ऑफ महाराष्ट्र चिपळूण शाखेत गेलो होतो. बँकेत दरमहा दहा तारखेच्या अगोदर पैसे काढणाऱ्यांची भलीमोठी रांग असते. तिथे विविध कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारीच अधिक असतात. सहजच माझी नजर त्या रांगेत गेली. तिथे उभ्या होत्या चितळे वहिनी! अत्यंत शांतपणे आपला नंबर येण्याची वाट बघत होत्या. मी चमकलो. अरे.... ज्यांचे पती पूर्वी या बँकेचे महाप्रबंधक होते, ज्यांच्या हाताखाली काही हजार कर्मचारी काम करत होते त्या सुधाकरराव चितळे यांच्या पत्नी आणि एका सामान्य खातेदाराप्रमाणे रांगेत उभ्या मला पाहून त्या हसल्या. मी म्हणालो, तुम्ही आत जर! तुमचं काम लगेच होईल. त्या म्हणाल्या, नको इथे ठीक आहे. मी असा वेगळा लाभ घेतला तर यांना आवडणार नाही आणि मलाही चालणार नाही. हे बँकेत असतानाही आम्ही अन्य कसले लाभ घेतलेले नाहीत. मी मनोमन दोघांनाही नमस्कार केला. त्यांचे चिरंजीव धनंजय यांनी मला सांगितलेल्या अनेक कथा आठवल्या. सुधाकरराव यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त काढलेल्या ऐके वडिलांची कीर्ती गौरव ग्रंथातल्या अनेकांच्या भावभावना आठवल्या. मेंगजी नावाचे एक कर्मचारी यांनी लिहिलेली आठवण विलक्षण होती. एकदा बँकेच्यावतीने दिवाळी भेट देण्यासाठी काही वस्तू खरेदी करणे आवश्यक होते. त्या वेळी बँकेचे झोनल मॅनेजर होते चितळे साहेब. मेंगजी त्यांना भेटले आणि एका कंपनीचा बँकेला मोठा उपयोग होतो. त्यांना बँकेकडून चांगली दिवाळी भेट द्यायला हवी, असे सांगितले. साहेबांनी शांतपणे किल्ली दिली आणि कपाट उघडायला सांगितले. कपाट उघडताच मेंगजी चमकले. आत चांदीच्या अत्तरदाणी, गुलाबपाणी, ताट, वाट्या, भांडी, किमती घड्याळे होती. त्या सगळ्या वस्तू चितळे साहेबांना लोकांनी भेट दिलेल्या होत्या. त्या वेळी त्यांची किंमत अंदाजे दोन लाख होती. साहेबांना मिळालेल्या भेटी त्यांनी कधीच घरी नेल्या नाहीत. त्या सगळ्या बँकेत असायच्या. कारण?... कारण त्या भेटी एका बँक अधिकाऱ्याला मिळालेल्या आहेत. त्यामुळे जरी भेटी त्यांना मिळालेल्या असल्या तरी त्यावर अधिकार बँकेचा आहे, असा जगावेगळा विचार फक्त चितळे साहेबच करू शकत.
अशीच आठवण त्यांच्या पत्नी शुभदा वहिनींची. चितळे साहेब साताऱ्यात डिव्हिजनल मॅनेजर होते. शुभदा वहिनी बायकांची भिशी होती तिथे गेल्या होत्या. जमलेल्या महिलांपैकी एकीने विचारले, ‘साहेबांना मिळालेला चांदीचा रथ पाहिलात ना?’ शुभदा वहिनींना काही समजेना. त्यांनी घरी येऊन साहेबांना विचारले, तर अतिशय शांतपणे साहेब म्हणाले, ‘सर्व शाखाधिकार्यांनी आपापली कामे नीट केली म्हणून आमची सातारा शाखा विभागात पहिली आणि डिव्हिजनल मॅनेजर म्हणून माझा सत्कार झाला आणि चांदीचा रथ दिला. तो रथ सातारा बँकेत ठेवलेला आहे. तुला बघायचा असेल तर तिथे येऊन बघ.
ते निवृत्त झाल्यानंतरही अगदी दूर दूर असलेले अनेक सहकारी त्यांना आवर्जून भेटायला यायचे आणि ज्यांना शक्य होत नसेल ते पत्ररूपाने भेटायचे. विशेष म्हणजे साहेब प्रत्येक पत्राला अतिशय आपुलकीने पत्र लिहायचे. दर दिवाळीत साहेब शुभेच्छा पाठवायचे. ते कसले छापील कृत्रिम आणि कोरड्या शुभेच्छा देणारे नसायचे. त्या पत्रात आपल्या उदात्त परंपरा आणि प्राचीनतम संस्कृतीशी जोडणारे नाते असायचे. कधी लोककथांमधून येणारे सामाजिक भान तर कधी लोकसाहित्याच्या परंपरेचा अक्षुण्ण धागा असायचा. अर्थात, त्याला कारणही तसेच होते.
जुन्या पिढीला मध्यमवर्गीय घरातले संस्कार, कुटुंबवत्सलता, समरसता ही परंपरेने झिरपत यायची. चितळे साहेबांवरही असेच संस्कार झाले होते. त्यांनीच एका लेखात शालेय जीवनातील आठवण लिहिली. ते तिसरी, चौथीला असताना शाळेत एक शिक्षक होते. उत्तम शिकवायचे. साहेबांचे वडीलही शिक्षक. एक दिवस बालवयातील सुधाकरने त्या शिक्षकांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. शिक्षकांनी विचारले, ‘घरी विचारलं आहेस का0 आधी घरी विचार आणि मग सांग.’ ते मागासवर्गीय असल्याने त्यांना समाजाकडून आलेले कटू अनुभव ठाऊक होते. सुधाकरने घरी वडिलांना विचारताच वडिलांनी उत्तर दिले, ‘आपण आपल्या घरी असे भेदभाव पाळत नाही. त्यांना अवश्य बोलावं.’ ते शिक्षक घरी आले आणि नंतरही येत गेले. समरसतेचे बाळकडू घरातूनच मिळालेले. चितळे साहेब आयुष्यभर केवळ तोंडपाटीलकी न करता जगले, जगन्मित्र झाले.
चितळे साहेबांना मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान होता. तो अभिमान त्यांनी कुटुंबातही प्रवाहित केला. त्यामुळे आपल्या मुलांच्या मौजीबंधनानंतर मुलांना घेऊन कुठल्या तीर्थक्षेत्राच्या आधी मुलांनी स्वदेश आणि स्वधर्म हे दैनंदिन संध्येइतकेच पवित्र मानण्याची दीक्षा दिली. चितळे यांना भ्रमंतीचा आणि पत्ते खेळायची, खाण्याची आवड! अनेकदा मुलांना घेऊन मिसळ आणि भजी खायला जायचे. ८५ वर्षाचे आयुष्य लाभले. खरेतर, २००९ ला ते आजारी पडले. आजारी म्हणजे जवळजवळ स्वर्गाच्या दाराला हात लावून परत आले. त्यांचा खेळकर आणि मिश्किल स्वभाव बघून मला वाटते, त्या वेळी स्वर्गाच्या द्वारपालाला सांगितले असावे, ‘मी येतोय, जरा पत्ते आणून ठेवा. इंद्राला म्हणावं तुला मेंढीकोट शिकवायचाय. मी येतोच, पण हो! खेळताना चहाच्यावेळी तुझं ते अमृतवगैरे तसलं काही नको. अप्सरेला सांगून भजी आणि मस्त मिसळ तयार ठेव. मी येतोच; मात्र घरातल्या सगळ्यांनी अथक शुश्रूषा करून त्यांना त्या वेळी स्वर्गाच्या दारातून परत आणले होते.
आता मात्र बँक ऑफ महाराष्ट्राचे एकेकाळचे महाप्रबंधक सुधाकर सीताराम चितळे खरेच स्वर्गवासी झाले. उभे आयुष्य कर्मयोगी म्हणून जगलेले चितळे साहेब म्हणजे अध्यात्म आचरलेले व्यक्तिमत्त्व. या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहिली आहे.