डॉक्टरांच्या वैद्यकीय चिठ्ठीशिवाय
नाही मिळणार कफ सिरप
विक्रीवर केंद्र सरकारचे ‘कडक’ निर्बंध
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : कफ सिरपच्या (खोकल्याच्या औषधा) गैरवापराने लहान मुलांचे झालेले मृत्यू आणि तरुणांमध्ये वाढलेले व्यसन या गंभीर घटनांची दखल घेत केंद्र सरकारने या औषधांच्या विक्रीवर अत्यंत कडक निर्बंध घातले आहेत. यापुढे मेडिकल दुकानांना अनेक प्रकारची खोकल्याची औषधे डॉक्टरांच्या वैध वैद्यकीय चिठ्ठीशिवाय विकता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
काही कफ सिरपच्या गैरवापरामुळे देशात गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत तसेच लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत याशिवाय, अनेक तरुण या सिरपचा उपयोग नशेसाठी (व्यसनासाठी) करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने औषधांच्या गैरवापरावर अंकुश ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे.
मेडिकल दुकानांत खोकल्याची औषधे (लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठीही असलेली) आता डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय (डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय) विकण्यास सक्त मनाई आहे. औषध विक्रेत्यांना प्रत्येक प्रिस्क्रिप्शनची नोंद ठेवावी लागणार आहे. यामुळे सिरप कोणाला आणि कधी विकले गेले, याचा तपशील उपलब्ध राहील.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणे यापुढे कायद्याचे उल्लंघन मानले जाईल आणि अशा दुकानदारांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. या आदेशामुळे आता खोकल्याचे सिरप खरेदी करण्यासाठी ग्राहकांना डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांचे प्रिस्क्रिप्शन घेणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत दक्षता घेण्यासोबतच औषधांचा होणारा गैरवापर थांबवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.