‘मुंबई-मडगाव’ला २० डबे लावा
जयवंत दरेकर ः कोकण विकास समितीचे पत्र
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १० : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सतत प्रचंड प्रतीक्षायादीसह धावत असून, वाढती मागणी लक्षात घेऊन या गाडीला १६ ते २० डबे लावून तिचे विस्तारीकरण करावे तसेच तिची मालकी आणि प्राथमिक देखभाल कोकण रेल्वेच्या मडगाव डेपोमध्ये हस्तांतरित करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर यांनी केली आहे. या संदर्भात रेल्वेबोर्ड, मध्यरेल्वे आणि कोकण रेल्वेला ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करूनही या संदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबई–मडगाव वंदे भारत सुरू झाल्यापासूनच ही ट्रेन सतत भरून चालत असून, प्रतीक्षा क्रमांक प्रचंड वाढलेले दिसत आहेत. फक्त आठ डबे असलेला सध्याचा रेक हा कोकण-गोवा रूटवरील मागणीच्या तुलनेत अत्यंत अपुरा आहे, असे समितीचे म्हणणे आहे. सुटीच्या हंगामात मुंबई-गोवा-कोकण मार्गावरील प्रवासी संख्या झपाट्याने वाढते. या काळात अतिरिक्त क्षमतेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि रेल्वेच्या महसुलातही मोठी वाढ होईल, असा समितीचा दावा आहे.
जालना-मुंबई आणि सोलापूर-मुंबई वंदे भारत रॅकची प्राथमिक देखभाल नांदेडकडे हलविल्यानंतर मुंबईत देखभाल स्लॉट उपलब्ध झाले आहेत. तरी देखील मुंबई-मडगाव वंदे भारतचा विस्तार प्रलंबित असल्याचे समितीने निदर्शनास आणले.