दखल...लोगो
इंट्रो
कोकणाशी बादरायण संबंध असलेला व जेमतेम मूळ गाव कोकणात असलेला कोणी उच्चपदी गेला, कोठे चमकला अथवा सर्वोत्तम कामगिरी केली की, येथील अस्मितांचे झेंडे फडकू लागतात. कोकणात परंपरा नसलेले फेटेही मग चढवले जातात. सर्वांनाच थोडे थोडे बरे वाटते. सत्कारमूर्ती पुन्हा कोकणात वळत नाही. सत्कार करणारे आपण कशासाठी केला, हे विसरून जातात. पुढारी नेहमीची यशस्वी वक्तव्ये करून निघून जातात. महाधिवक्ता ॲड. मिलिंद साठे अथवा हेमंत भागवत यांची कहाणी यापेक्षा निश्चित वेगळी आहे. ती का, हे समजून घ्यायला हवे.
- शिरीष दामले, रत्नागिरी
मालघर ते महाधिवक्ता, प्रेरणादायी प्रवास
अॅड. मिलिंद साठे ; अभ्यासोनी प्रकटावे हा बाणा
अॅड. मिलिंद साठे यांची महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी झालेली निवड ही निश्चितच कोकणी माणसाच्या अभिमानाचा विषय आहे. मालघरसारख्या खेड्यातून वाढलेला हा मुलगा आज महाअधिवक्ता पदापर्यंत पोहोचला यामुळे कोकणी माणसाची मान उंचावली यात नवल नव्हे. ॲड. साठे यांचे हे यश आणि त्यावरील कोकणची शान उंचावली, अशा आशयाच्या प्रतिक्रिया हे फक्त अस्मितेचे दर्शन राहू नये.
साठे यांचे महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण मालघर, रामपूर आणि चिपळूण येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण वगळता ते मराठी माध्यमातून शिकले. त्यांच्या पुढील कारकिर्दीची या निमित्ताने उजळणी होईलच; मात्र दोन गोष्टींकडे लक्ष वेधले पाहिजे. एक त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बहुतांश मराठीतून होऊनही ते आज या पदाला पोहोचले. त्यामुळे इंग्रजी माध्यमाचा सोर्स किती अनावश्यक हे अधोरेखित होते. दुसरी गोष्ट पदवीपर्यंत येथील साध्या कॉलेजमधून शिकलेला तरुण कायदाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीकडे वाटचाल करतो, हे येथील स्थानिकांना प्रेरणादायी आहे.
या आधीचे असेच एक चिपळूणचे व्यक्तिमत्व म्हणजे हवाईदलाचे निवृत्त एअरमार्शल हेमंत भागवत. त्यांची कारकीर्द ही अशीच समांतर; पण वेगळ्या क्षेत्रातील. यापासून आपण कोकणी लोक धडा घेणार का० आपला न्यूनगंड झटकून मोठी कामगिरी करण्याचे आव्हान पेलणार का० याची उत्तरे मिळणे महत्त्वाची.
साठे यांनी या आधीही मुंबईतील वकिलीक्षेत्रात अन् एकूणच कायदाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कायदा क्षेत्रातील त्यांचा लौकिक मोठाच आहे. २०१४ ला बॉम्बे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. मिलिंद साठे यांची निवड झाली. एक अर्थाने ही ऐतिहासिक घटना होती. मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांच्या वर्तुळामधील ही घटना असली तरी मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून तिचे महत्त्व आगळेच. १८६२ ला सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १५२ वर्षांनी मराठी माणूस बार असोसिएशनचा अध्यक्ष झाला होता. हायकोर्टाच्या दोन शाखांपैकी मूळ शाखेकडे डॉ. मिलिंद साठे वकिली करतात. त्यांची कारकीर्द झळाळती आहे. एलएलएम परीक्षेत ते मुंबई विद्यापिठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर फक्त वकिलीत न रमता त्यांनी पीएचडी मिळवली आहे. भारतीय संविधान आणि विश्वव्यापार संघटना यावर त्यांनी प्रबंध सादर केला. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर काय परिणाम होतो, हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ही वाटचाल अभ्यासोनी प्रकटावे असेच आहे. ॲड. साठे यांच्या यशाचे कौतुक अस्मितेपलीकडे जाऊन करावे लागेल...!
चौकट
गीता ज्ञानी
उच्चभ्रू वर्तुळात वावरत असताना मूळ संस्कृतीशीही त्यांची नाळ जोडलेली आहे. कायद्यासारख्या रूक्ष विषयाचा अभ्यास करत असताना त्यांचा गीतेचा अभ्यासही आहे. २०२० ला वयाची ६० वर्ष पूर्ण करत असताना त्यांनी गीतेचे अठरा अध्याय मुखोद्गत करून शृंगेरीच्या शंकराचार्यांसमोर सादर करून गीता ज्ञानी ही पदवी प्राप्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.