10113
ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे
आचरा येथे योग प्रक्षिक्षण
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १२ ः ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचे अध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ योग प्रशिक्षण पदविका प्राप्त अशोक कांबळी यांनी आपल्या घराच्या अंगणात पहिल्या टप्प्यात चार दिवसांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत योग प्रक्षिक्षण वर्ग सुरू केले. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आपले स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योग प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी सुरू केलेला योग प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे मत आचरेकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सुरेश ठाकूर, अरुंधती कांबळी, जे. एम. फर्नांडिस, सुरेश गावकर, श्रीमती फाटक, सौ. खेडकर आदी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना कांबळी यांनी, चार दिवसांचे सत्र सुरू केले आहे. वर्षभर अशी पंधरा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यात किमान दहा दिवस सहभागी होणाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण वर्गाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
.........................
10114
ज्ञानदीप हायस्कूलमध्ये
क्रीडा महोत्सवाला प्रारंभ
आचरा, ता. १२ ः ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी येथे क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हार-जीतची पर्वा न करता खिलाडूवृत्तीने खेळून आपले नैपुण्य दाखविण्याचे आवाहन यावेळी श्री. प्रभू यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक टकले यांच्यासह शिक्षक, कर्मचारीवर्ग, मुले व ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थाध्यक्ष प्रभू यांनी, मुलांना तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेमध्ये दिली जाणारी बक्षिसे स्वतः देण्याचे जाहीर केले. क्रीडा स्पर्धेची सुरुवात मशाल व ध्वज फिरवून संचलन करून करण्यात आली. श्री. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती बावकर यांनी आभार मानले.