10221
देवगड दत्त मंदिर जिर्णोद्धार,
सुशोभिकरण कामाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ : येथील श्री दत्त मंदिराचा जिर्णोद्धार आणि परिसर सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मंदिर नव्याने उभारुन परिसर सुशोभित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री गुरुदेवदत्त मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
येथील श्री दत्त मंदिर जुन्या काळातील आहे. त्यामुळे त्याचे नुतनीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याच्या भुमिपूजनावेळी दत्तात्रय जोशी, संदेश शिरसाट, सुनील पारकर, उद्योगपती नंदकुमार घाटे, माजी सरपंच बाळासाहेब ढोके, दादा पारकर, विद्याधर कार्लेकर, संतोष पाटणकर, उत्तम पोकळे, श्रीपाद पारकर, दिनेश पारकर, संतोष कुळकर्णी, सदानंद जोशी, दर्शन गोठोस्कर यांच्यासह अन्य उपस्थित होते. विकास गोठोस्कर यांनी सपत्नीक पूजन केले. श्री गुरुदेवदत्त मंदिर देवस्थान ट्रस्टने दत्तमंदिराचा जिर्णोद्धार व परिसर सुशोभिकरण करण्याचे ठरविले आहे. या कामी अंदाजित सुमारे ६० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासाठी देणगी धनादेशाद्वारे किंवा वस्तू स्वरूपात देखील स्वीकारली जाईल. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.