कुशल नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहू
बाबू पवार ः शृंगारपूर, कातूर्डीतील विकासकामांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः ग्रामस्थांनी सरपंच म्हणून थेट निवडून दिले आहे. आजपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच सरपंच या गावात राहिला असून यापुढेही कुशल व उत्कृष्ट नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. शृंगारपूर गाव आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा असून ग्रामपंचायतीवर आजही भगव्याचीच सत्ता आहे, असे प्रतिपादन शृंगारपूर ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद उर्फ बाबू पवार यांनी केले.
शृंगारपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, हे गाव ठाकरे शिवसेनेशी निष्ठावान असून येथे वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांनी शृंगारपूर व कातूर्डी गावांमध्ये विविध विकासकामे राबवून पायाभूत सुविधा मजबूत केल्या आहेत. या विकासकामांची पोचपावती म्हणूनच आज ग्रामस्थ ठाकरे शिवसेनेच्या बाजूने आहे. कातूर्डी गावामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई होती. तळेवाडी, बुद्धवाडी, म्हस्केवाडी या वाड्यांचा पाणी प्रश्न लक्षात घेऊन त्या-त्या वाड्यांसाठी स्वतंत्र नळ पाणी योजना राबवण्यात आल्या.