-rat१९p६.jpg-
२५O११७६६
दापोली ः पर्यटकांनी वाहने किनाऱ्यावर नेऊ नयेत यासाठी बीचवर जाणारा रस्त्यावर बॅरिकेटस लावण्यात आली आहेत.
-----
मुरूड किनाऱ्यावर जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद
स्टंटबाजीमुळे कार्यवाही ; पर्यटन व्यवसाय धोक्यात, व्यापारी नाराज
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १९ : तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांकडून होणाऱ्या वाहन स्टंटबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दापोली पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. चारचाकी वाहने समुद्राकडे जाणारे रस्ते थेट बंद करण्यात आल्याने मुरूडमधील पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
१६ डिसेंबरला काही पर्यटकांनी आपली वाहने थेट समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत नेऊन वेगवान वाहन चालवणे व स्टंटबाजी केल्याच्या तक्रारी दापोली पोलिस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोटारवाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई सुरू केली. किनाऱ्यावर वाहने नेल्यास पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाहनांचा थेट प्रवेश रोखण्यासाठी समुद्राकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर लोखंडी बॅरिकेट्स बसवण्यात आले असून, सायंकाळच्या वेळेत पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंगळवारी किमान शंभरहून अधिक पर्यटकांच्या गाड्या माघारी फिरल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, टपरीवाले, वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक, बोटचालक, छोटे दुकानदार तसेच हॉटेल व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुरूड गावात सध्या स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. पर्यटकांना वाहन पार्किंगसाठी समुद्रकिनाऱ्यावरील जागेवरच अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत संपूर्ण रस्ताच बंद केल्यास पर्यटकांनी मुरूडमध्ये यावे तरी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चौकट
समन्वयाने तोडगा अपेक्षित
ग्रामस्थांच्या मते, रस्ते बंद करण्याऐवजी गर्दीच्या वेळेत दोन सुरक्षारक्षक नेमल्यास वाहनांचे योग्य नियोजन करता येईल आणि स्टंटबाजीलाही आळा बसेल. केवळ बॅरिकेट्स लावून प्रश्न सुटणार नसून, स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणेने समन्वयातून तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोट
मुरूडमध्ये येणारा पर्यटक हा केवळ समुद्रकिनाऱ्यावर आनंद घेण्यासाठी येतो. पार्किंगची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसताना रस्ते बंद केल्यास पर्यटन आणि व्यवसाय दोन्ही धोक्यात येतील. पोलिस व स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे दोन सुरक्षारक्षक नेमून पार्किंग व वाहतूक नियोजन केले तर स्टंटबाजीला आळा बसेल आणि व्यावसायिकांचे नुकसानही होणार नाही.
- राजेश नरवणकर, वॉटरस्पोर्ट्सचे सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.